इस्लामाबाद – पाकिस्तानात एक प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान 42 जण ठार झाले आहेत. बलुचिस्तानात पूलाचा कठडा तोडून ही बस दरीत कोसळली असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बसमध्ये 48 प्रवासी होते आणि ही बस बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टापासून सिंध प्रांताची राजधानी कराचीला जात होती. लासबेला येथे एका अवघड वळणावर पूलाचा कठडा तोडून बस दरीत कोसळली. त्यानंतर या बसने पेट घेतला, असे लासबेलाचे राज्यपाल हमजा अंजूम यांनी सांगितले. आतापर्यंत घटनास्थळावरून 42 जणांचे मृतदेह सापडले आहेतय यामध्ये काही महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे, असेही अंजूम यांनी सांगितले.
बसमधील 48 प्रवाशांपैकी केवळ एक बालक आणि एका महिलेसह तिघांना जिवंत वाचवण्यात यश आले आहे. मात्र जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. अनेक मृतदेह ओळखण्यापलिकडे जळून गेले असल्यामुळे ओळख पटवण्यासाठी “डीएनए’ चाचणी करावी लागणार आहे. पोलीस आणि बचाव पथकातील सदस्य जळालेल्या बसमधील मृतदेह बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानातल्या रस्त्यांची विशेषतः महामार्गांची अवस्था फारच वाईट आहे. वाहन चालकांकडून सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात नसल्यामुळे अशाप्रकारचे अपघात नेहमी होत असतात. प्रवासी बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांचा भरणा असतो. त्यामुळे अपघातांमदील मृतांचा आकडा नेहमीच जास्त असतो.