नवी दिल्ली – एका रुग्णालयातील ब्रेन डेड महिलेचे हृदय काढून ते दुसऱ्या रूग्णालयातील रुग्णाला बसवण्यासाठी दिल्लीत शुक्रवारी रात्री 30 किमीचा ग्रीन कॉरिडॉर बनवण्यात आला होता.
या मार्गावर ज्या वाहनातून एका रुग्णालयातून हृदय दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले, त्या वाहनाला हे अंतर कापायला केवळ 37 मिनिटे 58 सेकंदाचा वेळ लागला. त्यासाठी दिल्ली व गुडगाव पोलिसांनी विशेष व्यवस्था केली होती. हदय नेणाऱ्या वाहनाला कोठेही थांबायला लागू नये यासाठी या मार्गावर अन्य वाहनांना पूर्ण बंदी करण्यात आली होती.
हरियानाच्या गुडगाव मधील एका हॉस्पिटलमध्ये एक 50 वर्षीय महिला ब्रेन डेड घोषित करण्यात आली होती. तिचे हृदय काढून ते दिल्लीच्या बीएलके मॅक्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील रुग्णाला शस्त्रक्रिया करून बसवण्यात आले.
ज्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली त्याचे हदय गेल्या पाच वर्षांपासून नीट काम करीत नव्हते. त्यामुळे त्याच्यावर ही हृदयारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ती यशस्वी झाली आहे. त्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत.