पिंपरी, (प्रतिनिधी) – लहान मुलांच्या कार्यक्रमात जो जिंकेल त्याला दुबईला ट्रिप असे आमिष दाखवून कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगत पाच जणांची २० लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत स्पाईस अप इव्हेन्ट अँड कास्टिंग संस्था, भोसरी येथे घडली.
रोहित मनोछा (वय ३८, रा. दिल्ली), मृदुल शर्मा (वय २९, रा. इंदोर, मध्यप्रदेश), संजू नंदा (वय ३०, रा. दिल्ली) आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्पाईस अप इव्हेन्ट अँड कास्टिंग संस्था भोसरी या संस्थेचे पदाधिकारी तसेच मॅनेजर यांनी संस्थेच्या नावाखाली लहान मुलांचे कार्यक्रम आयोजित केले.
या कार्यक्रमात जो जिंकेल त्याला दुबईला जाण्याची संधी मिळेल असे आमिष दाखवण्यात आले. त्यासाठी गुंतवणूक म्हणून फिर्यादीकडून एक लाख ३१ हजार रुपये, अजून ओएज खान यांच्याकडून दोन लाख २० हजार, अविनाश विठ्ठलराव शिंदे यांच्याकडून एक लाख ५० हजार, जगजीत सिंग यांच्याकडून आठ लाख रुपये, अनुप्रिता उन्मेष पाटील यांच्याकडून एक लाख ६० हजार रुपये असे एकूण २० लाख ३९ हजार रुपये घेत फसवणूक केली.