फलटण, (प्रतिनिधी)- येथे चारशे विद्यार्थ्यांनी केलेल्या मानवी साखळीद्वारे शंभर टक्के मतदानाचा संकल्प करण्यात आला. भारतीय निवडणूक आयोगामार्फत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होऊन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रम सुरू आहेत. माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये विविध पातळीवर विविध घटकांमार्फत जनजागृती सुरू आहे.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, स्वीप नोडल ऑफिसर एस. के. कुंभार, स्वीप पथक प्रमुख शहाजी शिंदे, पूजा दुदुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीचे काम सुरू आहे. श्री सदगुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेत स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी शंभर टक्के मतदान संकल्प करताना अनोख्या पद्धतीने 400 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मानवी साखळी तयार मतदानाबाबत जनजागृतीचा संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी स्वीप सहायक अधिकाऱयांनी पालक व शिक्षकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केले. मानवी साखळी तयार करून देण्यात आलेला 100 टक्के मतदान संकल्पाच संदेश नक्कीच मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत पोहचवून मतदान हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
दि. 7 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. एकाच वेळी 400 विद्यार्थ्यांनी आई- बाबांचा संकल्प, आमचा १०० टक्के मतदानाचा असे पत्र दिले. नागरिकांना मतदान जनजागृतीबाबत मतदान शपथ देण्यात आली. यावेळी स्वीप टीम सदस्य तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.