Lok Sabha Election 2024 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करणारे उद्धव ठाकरे आता त्यांच्यावर टीका करत आहेत, याचा मोबाइलवरील व्हिडिओ उपस्थितींना माइकवरून ऐकवत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासारखा फास्ट रंग बदलणारा सरडा आपण पाहिला नाही, असे म्हणत जोरदार टोला हाणला.
संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते. यावेळी गुलमंडी येथे झालेल्या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला.
शिंदे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरातील जनतेने शिवसेना, धनुष्यबाण आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर प्रेम केले. गेल्यावेळी थोडी गडबड झाली,
या वेळी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार नाही. धनुष्यबाणच निवडून येणार, 400 पारमध्ये संदीपान भुमरे मामा पाहिजेतच. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बाप एक नंबरी, बेटा दस नंबरी
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, रोटी, कपडा, मकान देणारे आपले पंतप्रधान आहेत. भ्रष्टाचाराचा एकही शिंतोडा त्यांच्यावर नाही, ते बेदाग आहेत. बाप एक नंबरी, तर बेटा दस नंबरी असल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदेंनी निशाणा साधला.
मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांना पोटशूळ उठला आहे. भुमरेंचा फॉर्म भरायला एवढ्या संख्येने तुम्ही आलात, त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे, असा दावा देखील शिंदे यांनी व्यक्त केला.
विनोद पाटलांची घरी जाऊन भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलनातील नेते तथा लोकसभेसाठी इच्छुक असलेले विनोद पाटील यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. विनोद पाटील यांनी काल अपक्ष म्हणून लढणार नसल्याचे सांगत माघार घेतली होती. त्यामुळे शिंदे यांनी त्यांची भेट घेतल्याने जिल्ह्यातील मतदानाचे गणित बदलू शकते, असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे.