Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर
Pune Water Cut: खडकवासला धरणसाखळी १०० टक्के भरली तरी जुलै अखेरपर्यंत पाणी पुरवण्यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याची तयारी.

Pune Water Cut- जोपर्यंत राज्याकडून लेखी अध्यादेश महापालिकेकडे प्राप्त होत नाही तोपर्यंत पाणीकपातीबाबत निर्णय घेता येणार नसल्याचे स्पष्टीकरण महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिले आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून पाणीकपात करण्याचा निर्णय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी जाहीर केला आहे. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वांनाच लागू राहणार आहे.
त्यामुळे पुणे महापलिकेलादेखील हा निर्णय घ्यावा लागणार आहे. पावसाचे प्रमाण, धरणसाठे आणि एकूणच राज्यातील पाण्याची स्थिती पाहता आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पुणे आणि परिसराचा विचार केला तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांतील पाणीसाठा १०० टक्के झाला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत सध्या धरणात एक टीएमसी पाणी कमी असले तरी आतापासूनच जलसंपदा विभाग आणि महापालिकेकडून पाण्याचे नियोजन केल्यास हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे हे नियोजन महापालिकेला १६ ऑक्टोबरपासून करावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर नियोजन करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने दाखवली होती.
आतापासूनच पालिकेने प्रत्येक आठवड्यात एक दिवस पाणीकपात केल्यास उन्हाळ्यात पुणेकरांना पुरेसे पाणी देणे शक्य होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे राज्यसरकारकडून लेखी अध्यादेश आल्यानंतर यावर विचार करून एक आठवड्यात यावर निर्णय घेतला जाईल, असे जगताप यांनी नमूद केले.
महापौर निर्णय घेतील
सुमारे गेल्या आठवड्यापासून महापौरांसह महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी परदेश दौऱ्यावर होते. तसेच आयुक्त सोडून अन्य अतिरिक्त आयुक्तही नव्हते. महापौर परतल्या आहेत परंतु, आता महापालिका आयुक्त परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे अध्यादेश आल्यानंतर महापौर आयुक्तांशी चर्चा करून यावर निर्णय घेतील, असे नंदकुमार जगताप यांनी सांगितले. आठवड्याला पाणीपुरवठा बंद ठेवण्याची प्रशासनाची तयारी असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.





