PCMC News: महापालिकेतील मुख्य विभागांची खांदेपालट! पाणीपुरवठा अन् स्थापत्य विभागांच्या जबाबदाऱ्या बदलल्या
PCMC News: महापालिकेच्या नवनियुक्त शहर अभियंत्यांसह सहशहर अभियंत्यांच्या खात्यांमध्ये मोठे फेरबदल; पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि स्थापत्य विभागांच्या जबाबदाऱ्यांचे नवे वाटप.

PCMC News – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, शहरी दळणवळण, ड्रेनेजलाइन, झोपडपट्टी पुनर्वसन हे विभाग सोपविण्यात आले आहेत. तर, महत्वाचा स्थापत्य विभाग मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे देण्यात आला आहे. स्थापत्य प्रकल्प, उद्यान व क्रीडा आणि पर्यावरण अभियांत्रिकी हे प्रमुख विभागही त्यांच्याकडे देण्यात आले आहेत.
शहर अभियंता सेठिया यांच्याकडे वरील विभागांसह तळवडेतील बायोडायव्हर्सिटी पार्क, संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय, वाकड येथील बॅडमिंटन कोर्ट, पिंपरी चौकातील माता रमाई सृष्टी आणि प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान या विशेष प्रकल्पांची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे वरील विभागांसह भामा-आसखेड पाणी योजना,
आंद्रा पाणी योजना, पवना बंद जलवाहिनी, निगडीतील सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र हे प्रकल्पही सोपवण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर यांच्याकडून ड्रेनेज विभाग काढून त्यांना बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाची जबाबदारी दिली आहे. हा विभाग सहशहर अभियंता सुनील भागवानी यांच्याकडे होता.
सहशहर अभियंता विनय ओहोळ यांच्याकडे ड्रेनेज विभाग कायम ठेवून पर्यावरण अभियांत्रिकीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, कार्यकारी अभियंता संध्या वाघ यांना पदोन्नती देऊन सहशहर अभियंता म्हणून स्थापत्य प्रकल्प विभागाची जबाबदारी सोपवली आहे. कार्यकारी अभियंता, क्षेत्रीय अधिकारी यांचे विभाग बदलण्यात आले आहेत.
तक्रारींची दखल घेऊन क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बदली
ह क्षेत्रीय अधिकारी पुजा दुधनाळे यांच्यावर सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी अनेक आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून ह क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी काढून घेऊन त्यांची भूमी आणि जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी म्हणून बदली केली आहे. त्यांच्यावर वैद्यकीय विभागाचे प्रशासन अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. संतोष कोराड यांच्याकडे ह क्षेत्रीय अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.




