पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) – आजारी असलेल्या अभियंत्याच्या त्याच्या राहत्या घरी मयत झाल्यानंतर या मृतदेहाची तब्बल 11 तास महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अक्षरश: अवहेलना केली. आपल्या करंटेपणाचा कळस करत सकाळी आठ वाजलेपासून रात्री सात वाजेपर्यंत हा मृतदेह संबंधिताच्या घरात पडून होता. एकमेकांवर जबाबदारी ढकलत आपल्यातील असंवेदना दाखविणाऱ्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्रशासकीय यंत्रणेचे वाभाडे काढत बेजबाबदारपणाचा कळस केला. हा प्रकार सांगवीतील शिंदेनगर येथे घडला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील शिंदेनगर, सांगवी येथे राहत असलेल्या एका आयटी अभियंत्याचा आज (शुक्रवारी) सकाळी मृत्यू झाला. संबंधित अभियंता हा गेल्या दीड महिन्यापासून “वर्क फ्रॉम होम’ करत होता. या अभियंत्याला दारू आणि सिगारेटचे व्यसन होते. आज सकाळी आपणाला त्रास होत असल्याचे त्याने आपल्या मित्राला सांगितले. मित्राने शेजाऱ्यांना कळविल्यानंतर शेजाऱ्यांनी सकाळी आठच्या सुमारास घराबाहेरून आवाज दिला. मात्र, आतून कोणताच रिस्पॉन्स न आल्याने बराच वेळ दरवाजा वाजविण्यात आला. मात्र त्यानंतरही आतून कोणताच रिस्पॉन्स मिळाला नाही.
यानंतर शेजाऱ्यांनी घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता संबंधित अभियंता निपचित पडून असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलीस यंत्रणा, महापालिकेची यंत्रणा तसेच वायसीएम रुग्णालयाला सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान कळविली. मात्र हा मृतदेह रुग्णालयात कोणी आणायचा यावरून दिवसभर वाद घालण्यात आला. सायंकाळी सात वाजेपर्यंत पोलिसांनी मृतदेह आणावा म्हणून महापालिकेचा वैद्यकीय विभाग आग्रह धरत होता तर मृतदेह वाहून नेण्याची जबाबदारी वैद्यकीय विभागाची असल्याचे सांगून बंदोबस्त उपलब्ध करून दिला.
यानंतरही निर्ढावलेल्या वैद्यकीय विभागाने केवळ ऍम्ब्यूलन्स पाठवून आपला करंटेपणा दाखवून दिला. दरम्यानच्या काळात शिंदेनगर हा दाट वस्तीचा परिसर असल्यामुळे शेजारीला रहिवाशांमध्ये महापालिकेच्या यंत्रणेबाबत प्रचंड संताप निर्माण झाला होता. अत्यंत संतप्त प्रतिक्रिया या रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत होत्या. विशेष बाब म्हणजे महापौर माई ढोरे यांचा हा वॉर्ड असून याच वॉर्डात प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या बेजबाबदारपणाची चांगलीच चर्चा परिसरात रंगली होती.
जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न
अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांच्याशी संपर्क साधला असता ही आपली जबाबदारी नसून, वायसीएमचे राजेश वाबळे यांची जबाबदारी असल्याचे सांगितले. तर डॉ. वाबळे यांनी आपण ऍम्ब्यूलन्स पाठविल्याचे सांगत हात झटकले.
प्रशासकीय यंत्रणेचे वाभाडे
शहराची लोकसंख्या 27 लाख असून, सध्या शहरात केवळ 81 रुग्ण आहेत. अत्यंत मायक्रोलेवलला आम्ही नियोजन केल्याचे आयुक्त वारंवार सांगत असताना आजचा प्रकार हा आयुक्तांच्या आणि प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत रुग्णांत प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आतापासून महापालिकेचे प्रशासन या पद्धतीने बेजाबदारपणा करत असेल तर रुग्ण वाढल्यास काय? याचा विचार न केलेलाच बरा, अशी स्थिती समोर आली आहे. आयुक्त कडक धोरण राबवून काही निर्णय घेणार की अशाच पद्धतीने नागरिकांच्या मृतदेहाची हेळसांड होताना बघ्याची भूमिका घेणार हा खरा प्रश्न आहे.
मृताचे नातेवाईक केरळात
आज मयत झालेला आयटी अभियंता हा 45 वर्षीय असून, तो आपल्या आईसोबत सांगवीतील शिंदेनगर येथे रहात होता. वर्षभरापूर्वी तो लंडनमध्ये कार्यरत होता. गतवर्षी आईचे निधन झाल्यानंतर तो सांगवी येथे परतला होता. पुढील महिन्यात त्याच्या आईला मृत्यू होऊन वर्ष होणार होते. वर्षश्राद्ध झाल्यानंतर यूएसमध्ये त्याची नियुक्ती होणार होती. मात्र, नियतीने त्याच्यावर आज झडप घातली. मयत अभियंत्याचे इतर सर्व नातेवाईक हे केरळमध्ये रहात आहेत.