प्रभात वृत्तसेवा
पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळया विषयांवर आरोप प्रत्यारोप आणि टिकांच्या फैरी झडत असून सोशल मिडीया तसेच माध्यमातून या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून एकमेकांचा “समाचार’ घेत आहेत. मात्र, हे राजकीय वैर बाजूला ठेवत या भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवीन कार्यालयात एकत्रित “पाहूणचार ” घेतला.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यालयाच्या पाहणीसाठी भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. त्यानुसार, ही भेटीचा कार्यक्रम पार पडला. मात्र, कोणताही गाजावाजा न करता ही भेट झाली. या वेळी राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काक़डे उपस्थित होते तर भाजपचे खासदार गिरिश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदिश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह भाजपच्या शहर कार्यकारीणीचे सदस्य उपस्थित होते. मात्र, या भेटीने नेत्यांवरून पधिकाऱ्यांमध्ये कितीही आरोप-प्रत्यारोप झाले, कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तरी राजकरणात काहीही होऊ शकतं याचा प्रतत्य पुन्हा आला आहे, तसेच आपले राजकीय नेते, पदाधिकारी किती भांडले तरी एकत्र येतात, मग कार्यकर्त्यांनी एकमेकांशी का वैर ठेवयाचे हा विचार करण्याची वेळ आहे. त्याच वेळी, राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या मित्र पक्षां आधी भाजपला कार्यालय भेटीचे निमंत्रण दिल्याने तसेच महाविकास आघाडीत वारंवार स्वबळाची भाषा होत असल्याने वेगवेगळया राजकीय चर्चां रंगल्या आहेत.