धोकादायक कालव्यात तरुण घेतायत पोहण्याचा आनंद

नदीत, विहिरीत पुरेसा पाणी साठा नसल्यानेदुधाची तहान ताकावर

वाई, दि. 12 (प्रतिनिधी) – शहरात स्विमिंग टॅंकमध्ये पोहोण्याचा आनंद घेता येतो तसाच ग्रामीण भागात पूर्वी विहिरीत, ओढ्यात, नदीकाठी असणाऱ्या पाण्याच्या डोहात मनसोक्त पोहोण्याचा आनंद घेता येत असे. काळानुरूप या पद्धतीत अमुलाग्र बदल झाला आहे. ग्रामीण भागातील विहिरीत पाणी नाही तर चिमणीला पिण्यासाठी पाणी नाही, अशी ओढ्यांची दुर्दैवी अवस्था झाली आहे.
नदीतील डोह बेसुमार वाळू उपशामुळे सध्या धोकादायक बनले आहेत. त्यामुळे तरुणांचे पाय कालव्याकडे वळताना दिसत आहेत. पोहोण्यासाठी धोकादायक असणाऱ्या कालव्यात वाई तालुक्‍यातील तरुण पोहोण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. धोम धरणाजवळ कृष्णा नदीवरून गेलेल्या पेटी कालव्यात सध्या धोमसह परिसरातील तरुण अतिशय धोकादायक असणाऱ्या कालव्यात बिन्दास्त पोहोण्याचा आनंद घेत आहेत. याकडे पालकांसह पाटबंधारे खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष असून डोळ्यावर पट्टी बांधली असल्याने दुर्दैवी घटनेला निमंत्रण देत असल्याचे चित्र वरखडवाडीजवळील कालव्यात दिसत आहे.
पोहोणे हे जरी शारीरिक व्यायामासाठी चांगला प्रकार असला तरी स्वतःचे जीवन धोक्‍यात घालून पोहोणे हे योग्य नव्हे, पोहोण्यासाठी पोहोण्याचे ठिकाण सुरक्षित असणे गरजेचे आहे. सध्या धकाधकीच्या जीवनात पालकांजवळ पाल्यासाठी वेळच नाही, त्यामुळे परीक्षेनंतर लागलेल्या सुट्टीच्या कालावधीत ग्रामीण भागातील मुलांचे पोहोणे हे एक मिशनच असते, त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी पोहोण्याचा आनंद घेतात. अशाच प्रकारे वरखडवाडी येथील पेटी कालव्यात पाण्याला अतिशय वेग असणाऱ्या ठिकाणी पोटाला पत्र्याचे डबे बांधून त्यांचा आवाज करीत कालव्याच्या एका बाजुने धोकादायक उड्या मारून दुसऱ्या बाजूला निघत स्वतःचा जीव धोक्‍यात घालून पोहोण्याचा प्रयत्न करीत आहेत. कृष्णा नदीवरील या पेटी कालव्यात पाटबंधारे खात्याने पाण्याच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोखंडी बार मोकळे सोडले आहेत. या बारवर वटवाघूळ, घुबड,व सापांचे वास्तव्य असते,डब्यांच्या आवाजाने हे प्राणी पोहोणाऱ्या युवकांवर हल्ला करण्याची शक्‍यता असते तरीही त्याकडे दुर्लक्ष करीत हे तरुण या कालव्यात पोहोतच असतात परंतु, यातून एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित खाते जागे होणार का?असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. वरखडवाडीतील कालव्यात पाणी अतिशय वेगाने वाहत असते हे सर्वांना ज्ञात आहे तरीही पालकांसह कोणाचेही या पोहोणाऱ्या युवकांकडे लक्ष नाही ही अतिशय संताप जनक बाब असून पाटबंधारे खात्याने त्वरित या बाबींकडे लक्ष देवून पोहोणाऱ्या युवकांवर मज्जाव करून त्याठिकाणी प्रतिबंधक फलक लावण्याची आवश्‍यकता आहे. अशी मागणी धोम परिसरातून ग्रामस्थ करीत आहेत. वाई तालुक्‍यातील कालव्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. तरी या अवस्थेतील कालव्यांकडे या युवकांनी डोळेझाक न करता सुरक्षित ठिकाणी पोहोण्याचा आनंद घ्यावा अशी काहीशी सुज्ञ नागरिकांची प्रतिक्रिया आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.