सायबर हल्ल्याचा परिणाम नाही, विप्रोकडून शेअरबाजाराकडे स्पष्टीकरण सादर

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांत विप्रो कंपनीतील काही कर्मचाऱ्यांच्या संगणकावर सायबर हल्ले झाल्याचे आढळून आले होते. मात्र, ही बाब समजताच कंपनीने तातडीच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे कंपनीच्या मुख्य कामकाजावर कसलाही परिणाम झालेला नाही, असे विप्रो कंपनीने म्हटले आहे.

तशी माहिती कंपनीने शेअरबाजारांना कळविली आहे. कंपनीने म्हटले आहे की, अशा घटना घडतात तेव्हा पर्यायी उपाययोजना केल्या जातात. त्या प्रकारच्या उपाययोजना केल्या गेल्यामुळे कंपनीच्या कामकाजावर परिणाम झालेला नाही. दहा दिवसांपूर्वी काही कर्मचाऱ्यांच्या संगणकावर सायबर हल्ला झाल्याचे कळल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला याची त्वरित माहिती दिली. त्यानंतर कंपनीकडून असे हल्ले किती संगणकावर झाले आहेत याची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर अशा संगणकावरील कामकाज ताबडतोब थांबविण्यात आले.

त्याचबरोबर या हल्ल्याचा संसर्ग कंपनीच्या इतर उपकरणांना होणार नाही याची आवश्‍यक ती काळजी घेण्यात आली. हा हल्ला कशामुळे झाला आणि कोणी केला, त्याचे काय परिणाम होतील या संबंधात तपशिलात माहिती मिळविण्याकरिता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. हे प्रकरण फारच सुरुवातीच्या टप्प्यात थांबविण्यात आल्यामुळे कंपनीच्या कोणत्याही कामकाजावर परिणाम झालेला नाही. असे कंपनीने म्हटले आहे.

त्याचबरोबर कंपनीच्या कोणत्याही ग्राहकाच्या कोणत्याही कामावर कसलाही परिणाम होण्याची शक्‍यता नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ही कंपनी बरीच मोठी असल्यामुळे अशाप्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना वेळोवेळी करण्यात येत असतात. आगामी काळातही अशा उपाययोजना करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच चौकशीच्या आधारावर आणखी काय करता येईल यावर विचार करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)