ZP School: झेडपी शाळा दुरुस्तीसाठी ६५ लाखांचा निधी मंजूर
ZP School:

ZP School: पुणे जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या ७७ प्राथमिक शाळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी ६५ लाख रुपयांच्या निधीला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी ही माहिती दिली. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आदर्श शाळा योजना राबवली जात आहे.
या योजनेच्या माध्यमातून अनेक शाळांमध्ये विविध शैक्षणिक आणि मूलभूत सोयीसुविधा उभारण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला होता, ज्यास समितीने मान्यता दिली आहे.
यामुळे शाळांमध्ये विकसित करण्यात आलेल्या सुविधा केवळ कागदोपत्री किंवा नावापुरत्या मर्यादित न राहता त्यांचा नियमित देखभाल-दुरुस्तीचा कार्यक्रम सातत्याने सुरू राहावा, असा यामागील मुख्य हेतू आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पूरक वातावरण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





