pune: लिफ्टमध्ये विद्यार्थिनीची १४ तासांची कोंडी!
pune:

महाविद्यालय प्रशासनाचा निष्काळजीपणा; रात्रभर अंधारात, अन्न-पाण्याविना काढली वेळ
pune: लोणी काळभोर येथील एमआयटी महाविद्यालयातील लिफ्टमध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनी तब्बल १४ तास अडकून पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लिफ्ट बंद पडल्याने अडकलेल्या विद्यार्थिनीची गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास सुटका झाली. वाघोली येथे राहणारी ही विद्यार्थिनी बुधवारी महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी लिफ्टने खाली येत होती. त्यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने पाचव्या आणि सहाव्या मजल्यादरम्यान लिफ्ट बंद पडली.
तिने मदतीसाठी आरडाओरडा केला; मात्र महाविद्यालय सुटल्याने इमारतीत कोणीही नसल्याने तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे संपूर्ण रात्र तिला अंधारात आणि अन्न-पाण्याविना काढावी लागली.
दरम्यान, मुलगी घरी न परतल्याने पालकांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली. गुरुवारी सकाळी वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर लिफ्टचे बटण दाबल्याने दरवाजा उघडला आणि विद्यार्थिनीची सुटका झाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक समाधान पवार यांनी या प्रकरणातील तांत्रिक जबाबदारीची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.





