pune : परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच
pune :

विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे पत्र बनावट व्हायरल
pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) हिवाळी २०२६ सत्र परीक्षा पंधरा दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याचे पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.
मात्र, हे परिपत्रक पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करत विद्यापीठ प्रशासनाने सर्व परीक्षा अधिकृत संकेतस्थळावरील नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडतील, असे स्पष्ट केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६- २७ मधील हिवाळी सत्राच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा प्रवेशपत्र छपाईतील तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे पंधरा दिवस पुढे ढकलण्यात आल्याचा मजकूर असलेले २० नोव्हेंबर २०२६ तारखेचे एक बनावट परिपत्रक समाजमाध्यमांवर फिरत होते.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला होता. याची गंभीर दखल घेत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी शनिवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या वृत्ताचे खंडन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या या गुन्हेगारी कृतीविरोधात विद्यापीठाकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सर्व संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. परीक्षेच्या अचूक माहितीसाठी केवळ विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ किंवा आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक आणि परीक्षा अधिकाऱ्यांशीच संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.





