NCP Crisis : काल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली शाहांची भेट; आज सुनेत्रा पवारांनी बोलावली बैठक, नेमकं काय घडतयं?
NCP Crisis : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली असल्याने पक्षात नेमकं काय सुरू आहे याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

NCP Crisis : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हाती आली. मात्र, पक्षाचे निर्णय खासदार पार्थ पवार घेत असल्याची चर्चा आहे. यामुळे पक्षामधील अंतर्गत मतदभेत अनेकदा समोर आले आहेत. या सगळ्यात एक महत्वाची घडामोड काल घडली आहे. पक्षातील बड्या नेत्यांनी काल दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली असल्याने पक्षात नेमकं काय सुरू आहे याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
अर्थखात्याची मागणी
या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सुनील तटकरे, प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे या वरिष्ठ नेत्यांनी रविवारी रात्री नऊ वाजता दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. जवळपास राष्ट्रवादीचे नेते आणि अमित शाह यांच्यात दोन तास बैठक सुरु होती. या बैठकीत अर्थखात्यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे समजते. पण यासोबतच पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नेत्यांनी शाहांपुढे नाराजी व्यक्त केली आहे.
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नेते नाराज?
विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पार्थ पवारांनी दोन महत्वाच्या नियुक्ता जाहीर केल्या. उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. या नियुक्त्या जाहीर करताना कोअर कमिटी आणि वरिष्ठ नेत्यांना विचारणे अपेक्षित होते. मात्र, तसे काहीच घडले नाही. यापूर्वी पार्थ पवार यांच्याकडून अशाप्रकारच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
सुनेत्रा पवारांनी बोलावली बैठक
महत्वाचे म्हणजे या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार हे दोघेही उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे. आज सुनेत्रा पवार यांनी आमदारांची महत्वाची बैठक मुंबईतील त्यांच्या देवगिरी या निवास्थानी बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र, रविवारी दिल्लीत आणि सोमवारी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आज सुनेत्रा पवार देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.




