Top 15 News : ज्ञानेश कुमार तुरूंगात जातील, राहुल गांधींचा इशारा ते SBI बँकेवर थरारक दरोडा…; वाचा आजच्या टॉप १ ० बातम्या
Top 15 News : ज्ञानेश कुमार तुरूंगात जातील, राहुल गांधींचा इशारा ते SBI बँकेवर थरारक दरोडा...; वाचा आजच्या टॉप १ ० बातम्या

Top 15 News : १ ) ज्ञानेश कुमार तुरूंगात जातील, राहुल गांधींचा इशारा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून पायउतार व्हावेच लागेल. मतचोरीत सामील होऊन देशद्रोह केल्याबद्दल त्यांनी भविष्यात तुरूंगात जावे लागेल, असा सज्जड इशारा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिला. यावेळी राहुल गांधी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही थेट आव्हान दिले. इंडिया आघाडीच्या रॅलीत बोलताना राहुल यांनी उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले. येथील प्रचंड गर्दीने मोदी, शहा आणि कुमार यांना संदेश दिला आहे. जमलेली गर्दी म्हणजे कुठल्या राजकीय पक्षाचा किंवा नेत्यांचा आवाज नाही. हा तरूण, शेतकरी आणि कामगारांचा आवाज आहे. लोकशाही आणि राज्यघटना उद्धवस्त होऊ न देण्याची ग्वाही हा आवाज देत असल्याचं त्यांनी म्हंटल. (Top 15 News)
२ ) पंतप्रधान व्हायचे, बनावट संसदेतच राहा; अमित शहा यांचा राहुल गांधींना टोला
१९८४च्या शीख नरसंहाराच्या वर्धापनदिनी विरोधकांनी देशाच्या राजधानीत जलसा साजरा केला, ही गोष्ट देश कधीही विसरणार नाही. हा जलसा आयोजित करणे म्हणजे दंगलीतील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जुन्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर केला. तसेच जर त्यांना पंतप्रधान व्हायचे असेल, तर त्यांनी आयुष्यभर अशाच एका बनावट संसदेतच राहावे, असा अप्रत्यक्ष टोला राहुल गांधी यांना लगावलाय. काँग्रेसवर असंवेदनशीलतेचा आरोप करताना त्यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा दाखला दिला. अमित शहा म्हणाले, गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस सातत्याने निवडणुका हरत आहे. त्यामुळे सोनिया गांधींचे, आपला मुलगा पंतप्रधान व्हावा, हे स्वप्न अजूनही अपूर्णच राहिले आहे. त्यामुळे त्यांनी बनावट संसद भरवण्याचा मार्ग शोधून काढला आहे. (Top 15 News)
३ ) महाराष्ट्रातील सरकार मतचोरीतून; खर्गेंचा मोठा दावा.
इंडिया आघाडीच्या रॅलीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक शैलीत भाषणे केली. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवून लोकशाही वाचवण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील सरकार मतचोरीतून सत्तेत आले असल्याचा गंभीर दावा केला. मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दलित, तरूण आणि महिलांची मतं हिरावून घेत आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून ते केले जात आहे. मोदी आणि शहा यांच्याकडून कुमार यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ते जमिनीखाली दडले तरी आम्ही कुमार यांना शोधून काढू, असा इशारा खर्गे यांनी दिला. केंद्रातील आणि महाराष्ट्र, बिहारसारख्या राज्यांमधील सरकारे मतचोरीच्या माध्यमातून बनली आहेत. मतचोरांना सत्तेबाहेर करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. (Top 15 News)
४) उत्तरप्रदेशची जनता मोदींना पायउतार करणार; अखिलेश, तेजस्वी यादव यांना विश्वास
रामलीला मैदानावरील प्रचंड गर्दी बदलाचे संकेत देणारी आहे, असे भाकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केले. ज्यांनी उत्तरप्रदेशच्या माध्यमातून केंद्राची सत्ता मिळवली; ते उत्तरप्रदेशातूनच सत्तेबाहेर जातील. उत्तरप्रदेशची जनता चांगल्या प्रकारे स्वागत करते. त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने निरोप देते, असा सूचक इशारा त्यांनी भाजपला दिला. उत्तरप्रदेशात नुकतीच विधान परिषद निवडणूक झाली. त्यामध्ये मोदींचा लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीतील दोन्ही जागा भाजपला गमवाव्या लागल्या. त्याचा संदर्भ देऊन अखिलेश यांनी टिप्पणी केली. इंडिया आघाडी मतचोरीविरोधात लढा देत आहे. वोटर्स विरूद्ध चीटर्स अशी ती लढाई आहे, असे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले. घटनात्मक संस्था न्याय देण्यात अयशस्वी ठरत असल्याचे संपूर्ण देश पाहत आहे. देश आणि ज्ञानेश कुमार यांपैकी एकाची निवड मोदींना करावी लागेल, असेही त्यांनी म्हंटले. (Top 15 News)
५ ) देशात काँग्रेसनेच सर्वप्रथम संविधानाची चोरी केली; फडणवीसांची टीका
काँग्रेसने आणीबाणीच्या काळात संविधानाची चोरी करत लोकशाही संस्थांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. आता देशात अराजकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय शक्ती आणि सोशल मीडिया अल्गोरिदमचा वापर करून चुकीची माहिती पसरवली जात आहे आणि देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. (Top 15 News)
ठाणे येथे भाजपद्वारे आयोजित लोकशाही वाचवा मोर्चात ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे लोक मतचोरीचा आरडाओरडा करत आहेत, त्यांनी स्वतः संविधान चोरी केली आहे. खरे तर तेच संविधान चोर आहेत. १९७५ मधील अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत, ज्याद्वारे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द करण्यात आली होती, असा आरोप त्यांनी केला. (Top 15 News)
६) जळगावात SBI बँकेवर थरारक दरोडा
जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक शाखेत शनिवारी दुपारी चित्रपटालाही शोभेल असा दरोडा पडला. हेल्मेट आणि मास्क घालून आलेल्या चार दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांना धमकावत सुमारे १५ लाखांची रोकड आणि २७ किलो सोने लुटल्याची माहिती समोर आलीय. दरोडेखोरांनी दोन राऊंड फायर केल्याचाही दावा करण्यात येतोय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने परिसरातील चार मार्गांवर नाकाबंदी केली. अवघ्या दोन तासांत चारही आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात यश आले. तपासात या दरोड्याचा कट बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक याने कारागृहात असतानाच रचला होता. आरोपींनी दरोड्यापूर्वी दोनदा बँकेची रेकी केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, बँकेतील आठही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे तपासात आढळून आलेय. (Top 15 News)
७) राज ठाकरेंच्या नातीचं ऐतिहासिक नाव चर्चेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांच्या कन्येचे नुकतेच बारसे पार पडले असून, राज ठाकरेंनी नातीचे नाव ‘अहिल्या’ असे ठेवलंय. या ऐतिहासिक नावाची सध्या जोरदार चर्चा सुरूय. अमित ठाकरे यांचा मुलगा कियान याला ७ सप्टेंबर रोजी अहिल्याच्या रूपात बहीण मिळाली. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तिचे बारसे पार पडले. ‘अहिल्या’ या संस्कृत नावाचा अर्थ सुंदर, निष्कलंक, पवित्र आणि दोषरहित असा सांगितला जातो. हिंदू पुराणात अहिल्या या गौतम ऋषींच्या पत्नी म्हणून उल्लेख आहेत. तसेच लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यामुळे या नावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेय. अहिल्याच्या आगमनामुळे ठाकरे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. (Top 15 News)
८) धनगर आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग
धनगर समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी समाज पुन्हा आक्रमक झालाय. सोलापुरात धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करत सरकारवर टीका केली. २०१४ मध्ये भाजपने सत्तेत आल्यास धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, बारा वर्षांनंतरही त्याची पूर्तता झाली नसल्याचा आरोप बोराडे यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, येत्या १ डिसेंबरला अहिल्यानगरमध्ये धनगर समाजाचा महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून मुंबईतील आंदोलनाची तारीख जाहीर केली जाणार असल्याचा इशाराही बोराडे यांनी दिलाय. (Top 15 News)
९) : पाटणमध्ये भाजप-शिवसेनेत प्रतिष्ठेची लढत
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाटण विकास सेवा सोसायटी गटातील लढत चुरशीची झाली आहे. या गटातून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि भाजपचे सत्यजित पाटणकर आमनेसामने आहेत. त्यामुळे महायुतीतील दोन पक्षांमध्येच थेट सामना रंगला आहे. दरम्यान, या गटातील १०४ मतदारांपैकी ५८ मतदारांनी आपल्याला मतदान केल्याचा दावा शंभूराज देसाई यांनी केलाय. सामान्य मतदारांच्या ताकदीवर आपण निवडणूक लढवत असून विजयाचा पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानावर निवडणुकीनंतर पक्षातील नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे देसाईंनी स्पष्ट केले. आता पाटणच्या या लढतीचा अंतिम निकाल काय लागतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेय. (Top 15 News)
१ ०) : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ नोव्हेंबरपासून सुरू
शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यानची बहुप्रतीक्षित मेट्रो लाईन ३ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सकाळी दहा वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे. पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली. २३.२ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर एकूण २३ स्थानके असून, पहिल्या टप्प्यात सुमारे १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत. या मेट्रोला पुणेरी मेट्रो किंवा पिंक मेट्रो असे संबोधले जाणार आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरील सर्व लोको पायलट महिला असणार आहेत. सौरऊर्जेचाही वापर या मेट्रो प्रकल्पात करण्यात आलाय. (Top 15 News)
१ १) पदवीधर निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी माझी
नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवावर भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना पराभवाची जबाबदारी स्वतःची असल्याचे मान्य केलेय. दरम्यान, काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर त्यांनी जोरदार टीका केली. विरोधकांकडून घटनात्मक संस्थांविरोधात जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदार याद्यांमधील दुबार आणि चुकीची नावे वगळून पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलीय. या मुद्द्यांवर जनजागृती करण्यासाठी येत्या ५ नोव्हेंबरला नागपुरात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी होणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. त्यामुळे नागपुरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. (Top 15 News)
१ २) मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायलला थेट इशारा दिलाय. भविष्यात इराणविरोधात कोणतीही लष्करी कारवाई झाल्यास युद्ध कधी आणि कोणत्या अटींवर संपवायचे, हे इराण ठरवेल, असे त्यांनी म्हटलेय. तसेच इराणच्या सशस्त्र दलांना कोणत्याही धोक्याला तातडीने प्रत्युत्तर देण्याचे आणि लक्ष्यांची यादी अद्ययावत ठेवण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील आणखी एक-दोन लक्ष्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीसह संपूर्ण मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याची चिंता व्यक्त केली जातेय. (Top 15 News)
१ ३) फुल चार्जमध्ये 212 किमीची रेंज
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर TVS iQube ST हा पर्याय लक्षवेधी ठरू शकतो. या स्कूटरमध्ये 5.3 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, कंपनीच्या दाव्यानुसार ती एका चार्जमध्ये 212 किलोमीटरपर्यंत धावू शकते. स्कूटरचा कमाल वेग ताशी 82 किलोमीटर आहे. यामध्ये 7 इंचांचा TFT टचस्क्रीन डिस्प्ले, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल आणि 118 पेक्षा जास्त स्मार्ट फीचर्स मिळतात. विशेष म्हणजे, 32 लिटरचे अंडरसीट स्टोरेज असून त्यात दोन हेल्मेट ठेवता येतात. सुरक्षेसाठी जिओफेन्सिंग आणि अँटी-थेफ्ट अलर्टसारख्या सुविधाही आहेत. TVS च्या वेबसाइटनुसार, या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 78 हजार 877 रुपये आहे. प्रत्यक्ष रेंज मात्र वापरानुसार बदलू शकते. (Top 15 News)
१ ४ ) आदेश बांदेकरांच्या सूनबाईंची छोट्या पडद्यावर दमदार एन्ट्री
झी मराठीने नव्या मालिकेची घोषणा केली असून, ‘येतेच आता मी नांदायला’ असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यादेखील या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. त्या ठकुबाई ही भूमिका साकारणार आहेत. तर पूजा बिरारी शिवानीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पूजासोबत अभिनेता हर्षद अतकरी मुख्य भूमिका साकारणार असून, ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. पूजा बिरारी ही आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांची सून असून, तिचं सोहम बांदेकरसोबत लग्न झालं आहे. त्यामुळे या नव्या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय. (Top 15 News)
१ ५ ) ‘मधल्या फळीतील पडझड अन् खराब क्षेत्ररक्षणावर बोट’
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात भारताला ७ गडी राखून पराभव पत्करावा लागला, मात्र संघाने मालिका ३-२ ने जिंकली. सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर याने संघातील उणिवांवर बोट ठेवले. तो म्हणाला, “मधल्या षटकांत लागोपाठ गडी गमावल्याने २०० हून अधिक धावा करण्याची संधी हुकली, तरीही १९१ धावा लढण्यासाठी चांगल्या होत्या. मात्र, मैदानात आमचे क्षेत्ररक्षण अतिशय सुस्त राहिले.” परदेशी मैदानांवरील काळे फ्लडलाईट्स आणि निरभ्र आकाशाखाली झेल टिपणे आव्हानात्मक असल्याचे सांगत, आगामी सामन्यांपूर्वी क्षेत्ररक्षणात सुधारणा करणे अत्यंत गरजेचे असल्याचे अय्यरने स्पष्ट केले. (Top 15 News)





