Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार तुरूंगात जातील.! राहुल गांधींचे मोदी-शहांना थेट आव्हान
कुमार यांच्यानंतर आम्ही मोदी आणि शहा यांच्या विरोधात उभे ठाकणार आहोत. मतचोरीबद्दल मोदी आणि शहा यांच्या विरोधातही कायदेशीर कारवाई होईल, असे रोखठोक भाष्य राहुल यांनी केले.

Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून पायउतार व्हावेच लागेल. मतचोरीत सामील होऊन देशद्रोह केल्याबद्दल त्यांनी भविष्यात तुरूंगात जावे लागेल, असा सज्जड इशारा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही थेट आव्हान दिले.
इंडिया आघाडीच्या रॅलीत बोलताना राहुल यांनी उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले. येथील प्रचंड गर्दीने मोदी, शहा आणि कुमार यांना संदेश दिला आहे. जमलेली गर्दी म्हणजे कुठल्या राजकीय पक्षाचा किंवा नेत्यांचा आवाज नाही. हा तरूण, शेतकरी आणि कामगारांचा आवाज आहे.
लोकशाही आणि राज्यघटना उद्धवस्त होऊ न देण्याची ग्वाही हा आवाज देत आहे. तुमच्याकडे कितीही सत्ता किंवा पैसा असो; तुम्ही राज्यघटनेपेक्षा मोठे होऊ शकत नाही, असे ते सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले. मोदी कुठेही जाणार नाहीत असे शहा म्हणतात.
मीही त्यांना सांगू इच्छितो की आम्हीही मोदींना कुठे जाऊ देणार नाही. कुमार यांच्यानंतर आम्ही मोदी आणि शहा यांच्या विरोधात उभे ठाकणार आहोत. मतचोरीबद्दल मोदी आणि शहा यांच्या विरोधातही कायदेशीर कारवाई होईल, असे रोखठोक भाष्य राहुल यांनी केले.






