Wrestling Federation Of India Elections : संजय सिंह यांना बजरंग-साक्षीचा विरोध; जाणून घ्या,यामागचं नेमकं कारण….

नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाची बहुचर्चित निवडणूक येत्या 21 डिसेंबरला होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आंदोलनकर्ते ऑलिम्पिक कुस्तीवीर बजरंग पुनिया व साक्षी मलिक यांनी केंद्रिय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना एक विनंती केली आहे. महासंघाच्या निवडणूकीत उमेदवार म्हणून उभे असलेल्या संजय सिंह यांना निवडणूकीत सहभाग गेऊ देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले आहे.
संजय सिंह हे महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय म्हणून मानले जातात. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप असून त्याबाबत सध्या तपास व चौकशी सुरु आहे.
ब्रिजभूषण यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप बजरंग, साक्षी व विनेश फोगट यांच्यासह अनेक भारतीय कुस्तीपटूंनी केले होते. तसेच त्यांना पदावरून हटवण्यासाठी अनेक दिवस दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनही केले होते. ब्रिजभूषण यांच्याशी संबंधित कोणतीही व्यक्ती निवडणूक लढवणार नाही, असे आश्वासन त्यावेळी ठाकूर यांनी दिल्यावर या कुस्तीपटूंनी आंदोलन स्थगित केले होते. मात्र, निवडणूकीत उभे राहीलेल्या उमेदवारांची नावे जाहीर झाल्यावर त्यात संजय सिंह यांचे नाव असल्याचे समोर आले व त्यामुळे पुन्हा एकदा या खेळाडूंनी ठाकूर यांना आवाहन केले आहे.
कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी संजय सिंह आणि माजी आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू अनिता शेरॉन यांच्यात लढत होणार आहे. शेरॉन यांनी २०१० सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. अशीच व्यक्ती महासंघावर निवडून आली तर कुस्तीपटूंवरील अन्याय दूर होतील, असेही आपल्या आवाहनात बजरंग व साक्षीने म्हटले आहे. आता यावर केंद्रिय क्रीडामंत्री ठाकूर काय प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले आहे.





