Anurag Thakur : ‘त्यांना पुन्हा हरण्याची भीती वाटतेय!’ अनुराग ठाकूर यांचा पाकिस्तानला टोला; बहिष्कारामागचं खरं कारण आलं समोर
Anurag Thakur : अनुराग ठाकूर म्हणाले, पाकिस्तानचा संघ हा निर्णय केवळ भारत पुन्हा त्यांना पराभूत करेल, या भीतीने घेत आहे.

Anurag Thakur mocks Pakistan boycott India match : टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्ताने भारताविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. यावर माजी केंद्रीय क्रीडा मंत्री आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. “पाकिस्तानचा संघ हा निर्णय केवळ भारत पुन्हा त्यांना पराभूत करेल, या भीतीने घेत आहे,” असा खोचक टोला ठाकूर यांनी लगावला आहे.
“त्यांना पुन्हा हरण्याची इच्छा नाही” –
सीएनएन-न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग ठाकूर यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर भाष्य करताना म्हटले की, “त्यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करायचा नाहीये, म्हणूनच ते मैदानातून पळ काढत आहेत.” पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबो येथे होणाऱ्या महामुकाबल्यावर बहिष्कार टाकण्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर ठाकूर यांनी हे विधान केले आहे.
बहिष्कारामागचे ‘राजकीय’ कनेक्शन –
पाकिस्तानने भारताच्या सामन्यावर टाकलेल्या बहिष्कारावर अनुराग ठाकूर यांची टीका
पाकिस्तान सरकारने या बहिष्काराचे कोणतेही स्पष्ट कारण दिलेले नाही, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामागे देशांतर्गत राजकीय दबाव असल्याचे समजते:
सुरक्षा आणि बलोचिस्तानचा प्रश्न: बलोचिस्तानमधील अलीकडील हल्ले आणि पाकिस्तानमधील ढासळलेली अंतर्गत सुरक्षा पाहता, भारतासोबत क्रिकेट खेळणे हे सध्या तिथे राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनले आहे.
कट्टरपंथीयांचा दबाव: पाकिस्तान सरकारला तेथील कट्टरपंथी गटांच्या टीकेचा सामना करायचा नाहीये. हे गट क्रिकेटला परराष्ट्र धोरणाचा भाग मानतात.
बोर्डाचे हित: संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्यास पीसीबीचे (PCB) मोठे आर्थिक नुकसान झाले असते आणि रँकिंगही घसरली असती. म्हणूनच त्यांनी केवळ भारताविरुद्धच्या सामन्यातून पळ काढत मधला मार्ग निवडला आहे.
PAKISTAN GOVERNMENT HAS ANNOUNCED PAKISTAN WILL BOYCOTT THE MATCH AGAINST INDIA IN T20 WORLD CUP. pic.twitter.com/gA3QkMfA0B
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 1, 2026
माजी क्रिकेटपटूंकडून टीका –
भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनीही पाकिस्तानच्या या निर्णयावर कडक शब्दांत टीका केली आहे. “पाकिस्तान सरकार आणि पीसीबी स्वतःच्या क्रिकेटचे नुकसान करत आहेत. अशा निर्णयामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होत असून त्यांचा विचार करण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे,” असे मदन लाल यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या सामन्यांचे वेळापत्रक (सर्व सामने कोलंबो):
७ फेब्रुवारी: विरुद्ध नेदरलँड्स (सुरुवात)
१० फेब्रुवारी: विरुद्ध अमेरिका
१५ फेब्रुवारी: विरुद्ध भारत (बहिष्कार/फॉरफिट)
१८ फेब्रुवारी: विरुद्ध नामिबिया





