Anurag Thakur : अनुराग ठाकूर यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! ९ वर्षांनंतर बीसीसीआयवरील हटवली बंदी
Anurag Thakur : या निर्णयामुळे अनुराग ठाकूर आता बीसीसीआयच्या बैठकांमध्ये आणि प्रशासकीय कामांमध्ये पुन्हा सक्रिय होऊ शकणार आहेत.

Anurag Thakur BCCI Ban Lifted by Supreme Court : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि हिमाचल प्रदेशचे खासदार अनुराग ठाकूर यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठी दिलासा दिला आहे. गेल्या नऊ वर्षांपासून बीसीसीआयच्या पदाधिकारावर असलेली त्यांची बंदी सुप्रीम कोर्टाने आता अधिकृतपणे उठवली आहे. या निर्णयामुळे अनुराग ठाकूर आता बीसीसीआयच्या बैठकांमध्ये आणि प्रशासकीय कामांमध्ये पुन्हा सक्रिय होऊ शकणार आहेत.
२०१७ चा आदेश सुप्रीम कोर्टाकडून सुधारित –
जानेवारी २०१७ मध्ये तत्कालीन मुख्य न्यायाधीश तीरथ सिंह ठाकूर यांच्या खंडपीठाने लोढा समितीच्या शिफारशी लागू न केल्यामुळे अनुराग ठाकूर यांना अध्यक्षपदावरून हटवले होते. तसेच त्यांना बीसीसीआयच्या अंतर्गत उपक्रमांपासून दूर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्य बागची यांच्या खंडपीठाने या जुन्या आदेशात सुधारणा केली आहे.
“आजीवन बंदी घालण्याचा आमचा हेतू नव्हता” –
🚨 BREAKING NEWS 🚨
Supreme Court lifts 9-year ban on BJP MP Anurag Thakur’s involvement with BCCI and clears the way for him to hold office or participate in the Board of Control for Cricket in India again. #AnuragThakur #SupremeCourt #BCCI #CricketNews pic.twitter.com/fe5b4XsN8M
— Public News X (@PublicNewsX) February 5, 2026
सुप्रीम कोर्टाने आपला निकाल देताना महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. कोर्टाने स्पष्ट केले की २०१७ मध्ये लादलेली बंदी ही आजीवन अयोग्यतेसाठी नव्हती आणि तसा हेतूही नव्हता. अनुराग ठाकूर यांनी यापूर्वीच कोर्टाची कोणतीही अट न ठेवता माफी मागितली होती, जी कोर्टाने स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांना प्रशासकीय कामांपासून दूर ठेवणे आता योग्य नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.
मिथुन मन्हास यांच्या कार्यकाळात नवीन समीकरणे?
अनुराग ठाकूर यांच्यावरील बीसीसीआयची बंदी उठवण्यात आली आहे.
नुकतेच मिथुन मन्हास यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या या ग्रीन सिग्नलनंतर अनुराग ठाकूर पुन्हा बीसीसीआयमध्ये एखादे महत्त्वाचे पद भूषवणार का? याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे. लोढा समितीच्या नियमांनुसार वय आणि सरकारी पदाबाबत असलेल्या अटी अद्याप लागू असल्या, तरी ठाकूर यांच्या पुनरागमनामुळे क्रिकेटच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.





