Anurag Thakur : राजकारणाचे शुद्धीकरणासाठी प्रतिभावान तरुणांची गरज; अनुराग सिंह ठाकूर यांचे प्रतिपादन
Anurag Thakur : १५ व्या भारतीय छात्र संसदेचा दिमाखदार समारोप; राजकारणात तर्क आणि तथ्यांच्या आधारावर काम करण्याचे अनुराग ठाकूर यांचे आवाहन.

Anurag Thakur – धोरणनिर्मिती, प्रशासन आणि सार्वजनिक सेवेतील गुंतागुंत समजून घेऊन तरुणांनी राजकीयदृष्ट्या कुशल आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील होणे काळाची गरज आहे. राजकारणाला शुद्ध करण्यासाठी सक्षम आणि प्रतिभावान तरुणांनी या क्षेत्रात प्रवेश करावा, असे आवाहन खासदार अनुराग सिंह ठाकूर यांनी केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे योजित १५ व्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर माजी खासदार शाहिद सिद्दीकी, खासदार डॉ. संदीप कुमार पाठक, छात्र संसदेचे संस्थापक डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आणि सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते. ठाकूर म्हणाले, की २१ व्या शतकात कॅम्पस ते कॅबिनेट असा प्रवास करताना तरुणांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिकतेशी जुळवून घेतले पाहिजे. गेल्या दशकात देशातील शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून, आयआयटी, आयएमएम आणि विद्यापीठांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
आत्मनिर्भर भारतासाठी सेमीकंडक्टर आणि हेल्थकेअर क्षेत्रात अतुलनीय वृद्धी होत असून विरोधकांनीही तर्क आणि तथ्यांच्या आधारे राजकारण करावे. सिद्दीकी यांनी तरुणांना तंत्रज्ञानावर पूर्णतः अवलंबून न राहता मानसिकतेत बदल करण्याचे आवाहन केले. डॉ. पाठक यांनी विद्यापीठांमध्ये निवडणुका होणे गरजेचे असल्याचे सांगत, मूल्याधिष्ठित राजकारणातूनच देशाचे भविष्य उज्ज्वल होईल, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. राहुल कराड यांनी भ्रष्टाचार, जातिवाद आणि वसाहतवादी मानसिकतेत बदल घडवण्याची गरज अधोरेखित केली.





