Women’s T20 World Cup 2024 : विजेत्या न्यूझीलंडबरोबर उपविजेता आफ्रिका संघही झाला मालामाल, तर टीम इंडियालाही मिळाले करोडो रुपये..

Women’s T20 World Cup 2024 Prize Money : गेल्या रविवारी, न्यूझीलंडने महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 32 धावांनी पराभव करून इतिहास रचला. पुरुष आणि महिला क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडने टी-20 विश्वचषक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्रॉफी जिंकण्यासोबतच न्यूझीलंड संघाने बक्षिसांची मोठी रक्कमही जिंकली आहे. साधारणपणे, कोणत्याही फॉरमॅटमध्ये विश्वचषक जिंकल्यावर विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करोडो रुपयांची बक्षीस रक्कम मिळते. आयसीसीने महिला टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी एकूण 7,958,080 अमेरिकन डॉलरचे (साधारण 66 कोटी रुपये) बक्षीसांसाठी खर्च केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया, विश्वचषक जिंकल्यानंतर विजेत्या संघावर किती कोटी रुपयांचा वर्षाव झाला.
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 मध्ये, न्यूझीलंड संघाने गट टप्प्यापासून अंतिम फेरीपर्यंत चमकदार कामगिरी केली ज्यामध्ये त्यांना केवळ ऑस्ट्रेलियन महिला संघाकडून गट टप्प्यात पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंड संघाला टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर आयसीसी कडून जवळपास 19.67 कोटी रुपये (2.34 मिलियन डॉलर) बक्षीस म्हणून मिळाले आहेत तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिका संघाला जवळपास 10 कोटी रुपये ($1.17M) मिळाले आहेत. महिला टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघांनाही 5.60 कोटी रुपये ($675,000) बक्षीस म्हणून मिळाले आहेत.
EQUAL PRIZE MONEY!! 🤩
Total prize: $7.95M
Winner: $2.34M
Runners-up: $1.17M
Semi-finalists: $675,000
Group stage Winners: $31,154
10 Participating teams: $112,500#CricketTwitter #T20WorldCup2024 pic.twitter.com/Lh1NqsabFL— Female Cricket (@imfemalecricket) September 17, 2024
गट टप्प्यातील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी संघांना 25.85 लाख रूपये($31,154) मिळाले. यानुसार पाहिले तर, किवी संघाला एकूण 21 कोटी 40 लाख 37 हजार रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. उपविजेता ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला या स्पर्धेत एकूण 11 कोटी 56 लाख 76 हजार रूपये बक्षीस रक्कम मिळाली आहे.
भारतीय संघाला मिळाली इतकी बक्षीस रक्कम…
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली ICC महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये खेळण्यासाठी आलेल्या भारतीय महिला संघाची या स्पर्धेत अतिशय खराब कामगिरी झाली होती ज्यामध्ये संघ गट स्टेजमधूनच बाहेर पडला होता. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये एकूण 2 सामने जिंकले, ज्यामुळे त्यांना 52 लाख 38 हजार 200 रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. याशिवाय टीम इंडियाला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 94 लाख 57 हजार 812 रुपये ($112,500) मिळाले. तसेच ए आणि बी ग्रुपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भारत आणि इंग्लंड या संघांना, तसेच चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश या चार संघांना प्रत्येकी 2.24 कोटी ($270,000) बक्षीस मिळाले आहे. अशाप्रकारे, भारतीय महिला संघाला एकूण 3 कोटी 73 लाख 94 हजार 756 रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.
तसेच, दोन्ही गटात शेवटच्या स्थानी राहिलेल्या श्रीलंका आणि स्कॉटलंडला प्रत्येकी 1.12 कोटी ($135,000) बक्षीस रक्कम मिळाली आहे. श्रीलंका आणि स्कॉटलंड यांना स्पर्धेत एकही विजय मिळवता आला नव्हता. गट टप्प्यातील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी संघांना 25.85 लाख रूपये($31,154) मिळाले. त्यामुळे ही रक्कमही संघांना त्यांच्या स्थानानुसार मिळालेल्या बक्षीसामध्ये सामील केली जाणार आहे.





