Women’s T20 World Cup 2024 : जगाला मिळाला नवा चॅम्पियन..! न्यूझीलंडने द. आफ्रिकेला पराभूत करत पटकावलं विजेतेपद….

Women’s T20 World Cup 2024 Final (NZ W vs SA W) : दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पार पडला. महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 32 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. किवींनी प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 विकेट गमावत 158 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ 20 षटकात नऊ गड्यांच्या मोबदल्यात केवळ 126 धावा करू शकला. न्यूझीलंडने 32 धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच टी-20 विश्वचषक जिंकला.
2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद गमावले, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आफ्रिकन संघ पुन्हा एकदा ‘चोकर्स’ ठरला. यावेळी फरक एवढाच होता की, आफ्रिकन महिलांनी टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद गमावले. याआधी आफ्रिकेचा पुरुष संघ 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताविरुद्ध पराभूत झाला होता. आता महिला T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेला 32 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.
What a win! 🎉
The White Ferns are the Women’s #T20WorldCup 2024 champions 🤩#WhateverItTakes | #SAvNZ 📝: https://t.co/szzxGPRxxK pic.twitter.com/m7u0Vwq0Q6
— T20 World Cup (@T20WorldCup) October 20, 2024
अंतिम सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली होती. कर्णधार वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 6.5 षटकांत 51 धावा जोडल्या. मात्र, सलामीची भागीदारी तुटताच दक्षिण आफ्रिकेचा संघ दडपणाखाली आला आणि त्यांनी ठराविक अंतराने विकेट गमावल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून कर्णधार वूलवर्डने सर्वाधिक 33 धावांची खेळी खेळली. ब्रिट्सने 17 आणि क्लो ट्रायॉनने 14 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून अमेलिया केर आणि रोझमेरी मायरने प्रत्येकी तीन बळी घेतले.
South Africa need 159 Runs to win their maiden Women’s T20 World Cup Title 🏆 #CricketTwitter #T20WorldCup #SAvNZ pic.twitter.com/DdfaUnNn0h
— Female Cricket (@imfemalecricket) October 20, 2024
तत्पूर्वी, दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला पहिला धक्का दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर 16 धावसंख्येवर जॉर्जिया प्लिमरच्या रूपाने बसला. जिने 7 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 09 धावा केल्या. त्यानंतर सुझी बेट्स आणि अमेलिया केर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 37 धावांची (36 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी 8व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संपुष्टात आली जेव्हा सुझी बेट्स 31 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 32 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर संघाला तिसरा धक्का 11व्या षटकात कर्णधार सोफी डिव्हाईनच्या (06) रूपाने बसला.
त्यानंतर ब्रुक हॅलिडे आणि अमेलिया केर यांनी चौथ्या विकेटसाठी 57 धावांची (44 चेंडू) भागीदारी केली. ही उत्कृष्ट भागीदारी 18व्या षटकात संपुष्टात आली जेव्हा ब्रुक हॅलिडे 28 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 38 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर शानदार खेळी करणाऱ्या अमेलिया केरने 38 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 43 धावा करत पॅव्हेलियनचा रस्ता धरला. त्यानंतर सहाव्या विकेटसाठी मॅडी ग्रीन आणि इसाबेला गेज यांनी 17 धावांची (7 चेंडू) अखंड अशी भागीदारी करत निर्धारित षटकात संघाला 5 बाद 158 धावसंख्येपर्यंत नेले.
आफ्रिकन गोलंदाजांची कामगिरी …
आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको म्लाबाने सर्वाधिक 2 बळी घेतले. यादरम्यान तिने 4 षटकात 31 धावा दिल्या. याशिवाय अयाबोंगा खाका, नादिन डी क्लार्क आणि क्लो ट्रायॉन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. यादरम्यान अयाबोंगा खाकाने 4 षटकांत 44 धावा, नदिन डी क्लर्कने 2 षटकांत 17 धावा आणि क्लो ट्रायॉनने 4 षटकांत 22 धावा दिल्या.





