U19 World Cup : भारत सहाव्यांदा बनला विश्वविजेता, पण रिकाम्या हाताने परतणार! ICC बक्षिसाची रक्कम का देत नाही? समोर आलं कारण
U19 World Cup : हरारेमध्ये वैभव सूर्यवंशीच्या वादळी (१७५) शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडचा पराभव करून विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक उंचावला.

Why ICC does not give prize money for U19 World Cup : भारतीय युवा संघाने हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर पुन्हा एकदा तिरंगा फडकवला आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी धुव्वा उडवत सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरले. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतर एक प्रश्न चर्चेत आहे, तो म्हणजे इतक्या मोठ्या विजयानंतरही आयसीसी (ICC) विजेत्या संघाला बक्षिसाची रक्कम का देत नाही? याबद्दल जाणून घेऊया.
फायनलमध्ये वैभव-आयुषचा धमाका –
अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद ४११ धावांचा विक्रमी डोंगर उभा केला. अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत १७५ धावांची वादळी खेळी केली. यात त्याने १५ चौकार आणि १५ षटकार ठोकले. कर्णधार आयुष म्हात्रेने ५३ धावांचे योगदान दिले, तर कनिष्क चौहानच्या फटकेबाजीमुळे भारताने ४०० चा टप्पा पार केला.
🚨 News 🚨
BCCI congratulates India Under-19 team on sixth ICC Men’s Under-19 World Cup triumph.
Details 🔽 | #U19WorldCup https://t.co/OG56zLQf1L
— BCCI (@BCCI) February 6, 2026
प्रत्युत्तरात ४१२ धावांचे महाकाय लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जोसेफ मुरेस (१७) लवकर बाद झाला. त्यानंतर बेन डॉकिन्स (६६) आणि बेन मेयस (४५) यांनी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट्स घेत इंग्लंडवर दबाव कायम ठेवला. ज्यामुळेइंग्लंडचा संघ ४०.२ षटकांत ३११ धावांत गारद झाला.
विजेत्या संघाला ‘प्राईज मनी’ का मिळत नाही?
२०२६ चा अंडर १९ वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ
अंडर-१९ विश्वचषक जिंकूनही आयसीसीकडून विजेत्या संघाला कोणतीही अधिकृत रोख रक्कम (Prize Money) दिली जात नाही.
१. विकासात्मक स्वरूप: ही स्पर्धा व्यावसायिक फायद्यापेक्षा तरुण खेळाडूंच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी आयोजित केली जाते. खेळाडूंना अनुभव आणि व्यासपीठ मिळवून देणे हा मुख्य उद्देश आहे.
२. व्यावसायिकता टाळणे: बहुतांश खेळाडू १८ वर्षांखालील असतात. त्यांना सुरुवातीच्या काळात मोठ्या रोख रकमा देण्याऐवजी क्रिकेटमधील प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले जाते.
३. मंडळांना निधी: आयसीसी थेट खेळाडूंना पैसे न देता सहभागी देशांच्या क्रिकेट मंडळांना (उदा. BCCI) विकास निधी आणि स्पर्धा अनुदान देते.
बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव –
जरी आयसीसी रोख रक्कम देत नसली, तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आपल्या खेळाडूंना मालामाल करते. २०२४ मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला ३० लाख रुपये दिले होते. त्यानंतर २०२५ च्या महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषक विजयानंतर संपूर्ण संघाला ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यंदाही सहाव्यांदा विश्वविजेते बनलेल्या आयुष म्हात्रेच्या संघासाठी बीसीसीआय मोठं बक्षिसं जाहीर करण्याची शक्यता आहे.





