Women’s Asia Cup 2024 : आज रंगणार सेमीफायनलचा थरार..! गतविजेत्या टीम इंडियाची बांगलादेशशी तर पाकची श्रीलंकेशी होणार लढत….

Women’s Asia Cup 2024 (Semi Final) : महिला आशिया चषक 2024 च्या उपांत्य फेरीतील चारही संघांचे चित्र स्पष्ट झाले आहे. बुधवारी, जेव्हा श्रीलंकेने स्पर्धेतील शेवटच्या गट सामन्यात थायलंडवर नेत्रदीपक विजय नोंदवला तेव्हा चार संघ अंतिम चारसाठी निश्चित झाले. स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीत गतविजेत्या भारताचा सामना बांगलादेशशी, तर पाकिस्तानचा सामना यजमान श्रीलंकेशी होणार आहे.
महिला आशिया चषक 2024 चा शेवटचा गट सामना बुधवारी खेळला गेला. श्रीलंकेने मलेशियाचा 10 गडी राखून पराभव केला. चामारी अथापट्टूचा श्रीलंकेचा संघ हा गतविजेता भारताशिवाय एकमेव संघ होता ज्याने स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. मलेशियाने श्रीलंकेच्या संघाला 94 धावांचे माफक लक्ष्य दिले होते. श्रीलंकेच्या कर्णधाराच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर हे लक्ष्य गाठता आले. विश्मी गुणरत्नेही 39 धावा करून नाबाद परतली आणि संघाने 11.3 षटकांत सामना जिंकला.
भारताचा सामना बांगलादेशशी….
श्रीलंकेच्या या विजयासह स्पर्धेतील चारही उपांत्य फेरीतील खेळाडू निश्चित झाले आहेत. भारतीय महिला संघाने नेपाळचा 82 धावांनी पराभव केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान अ गटातून आधीच पात्र ठरले होते. गतविजेत्याने अ गटात अव्वल स्थान पटकावले असून पहिल्या उपांत्य फेरीत त्यांचा सामना ब गटातील दुसऱ्या स्थानावरील बांगलादेशशी होईल. दरम्यान, दुसऱ्या उपांत्य फेरीत अ गटातील उपविजेत्या पाकिस्तानचा सामना ब गटातील अव्वल श्रीलंकेशी होईल.
एकाच दिवशी खेळवले जातील दोन्ही सामने…
दरम्यान, भारताव्यतिरिक्त बांगलादेश हा महिला आशिया कप जिंकणारा एकमेव संघ आहे. भारताने सात वेळा तर बांगलादेशने एकदा विजेतेपद पटकावले आहे. शुक्रवारी, 26 जुलै रोजी दोन्ही बाद (नाॅकआऊट) फेरीचे सामने एकाच दिवशी खेळवले जातील. भारत विरुद्ध बांगलादेश उपांत्य फेरीचा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल, तर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 28 जुलै रोजी होणार आहे.
भारत आठव्या विजेतेपदाच्या मोहिमेवर….
भारतीय महिला क्रिकेट संघ आठव्यांदा आशिया चषक जिंकण्याच्या मोहिमेवर आहे. भारताने वनडे फॉरमॅटमध्ये चार आणि टी-20 फॉरमॅटमध्ये तीन जेतेपदे पटकावली आहेत. महिला आशिया चषक 2004 मध्ये सुरू झाला आणि टीम इंडिया त्यावेळी चॅम्पियन बनली. 2008 पर्यंत ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळली जात होती. त्याच वेळी, 2012 पासून ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळली जात आहे. ही नववी आवृत्ती आहे आणि भारताने सात वेळा (2004, 2005, 2006, 2008, 2012, 2016, 2022) विजेतेपद पटकावले आहे.
तर अंतिम फेरीत पाकिस्तानशी सामना….
भारतीय संघ बांगलादेशला पराभूत करण्यात आणि पाकिस्तान संघ श्रीलंकेला उपांत्य फेरीत पराभूत करण्यात यशस्वी ठरला, तर महिला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत विरूध्द पाक अशी मोठी स्पर्धा पाहायला मिळू शकते.





