Women’s T20 World Cup 2024 : उपांत्य फेरीचे 4 संघ ठरले…! जाणून घ्या, सामने कधी-कुठे अन् केव्हा खेळवले जाणार…

Women’s T20 World Cup 2024 (Semi-final) : महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीतील चार संघ निश्चित झाले आहेत. अ गटातून सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले होते. आता ब गटातील उर्वरित दोन संघांनीही उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर टीम इंडियाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
‘अ’ गटातून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनंतर ‘ब’ गटातून वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत स्थान पक्के केले. मंगळवारी झालेल्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडवर विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. या पराभवासह इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडला. वेस्ट इंडिजच्या विजयासह दक्षिण आफ्रिकेनेही उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे आफ्रिकेने आगेकूच केली.
गुणतालिकेची स्थिती…
स्पर्धेत अ गटातून ऑस्ट्रेलिया (8 गुण) आणि न्यूझीलंड (6 गुण) या 2 संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरला. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील 4 पैकी 4 सामने जिंकले. तर न्यूझीलंडने 4 पैकी 3 सामने जिंकत आगेकूच केली. दुसरीकडे ‘ब’ गटातून उपांत्य फेरीसाठी विंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये चुरस होती. या तिन्ही संघांनी साखळी फेरीत 4 पैकी 3 सामने जिंकले होते. त्यामुळे तिन्ही संघाचे प्रत्येकी 6 गुण झाले होते. मात्र नेट रनरेटच्या जोरावर विंडिज (+1.536), दक्षिण आफ्रिका(+1.382) हे दोन 2 संघ निश्चित झाले आणि त्यामुळे इंग्लंडला (+1.091) बाहेर पडावे लागले.
उपांत्य आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक…
महिला टी-20 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुरुवार, 17 ऑक्टोबर रोजी दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा उपांत्य सामना वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात शारजाह येथील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. यानंतर रविवारी, 20 ऑक्टोबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल, ज्यामध्ये उपांत्य फेरीतील दोन्ही विजेते संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार तिनही सामने रात्री 7.30 वाजता सुरू होतील. त्यापूर्वी 7.00 वाजता टाॅस केला जाईल.
सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहायचं?
तुम्ही भारतात स्टार स्पोर्ट्स या चॅनलवर टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा सामना पाहू शकता. सामन्याचे लाइव स्ट्रीमिंग Disney + Hotstar वर उपलब्ध असेल. तुम्ही Disney + Hotstar वर हा सामना विनामूल्य पाहू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही सबस्क्रिप्शनची गरज भासणार नाही.
Mark your calendars 🗓️
The #T20WorldCup 2024 semi-finals are locked in 🔒
Details 👉 https://t.co/6dsyD3vJcN pic.twitter.com/CfBVdLbDZT
— T20 World Cup (@T20WorldCup) October 16, 2024
असा होता भारतीय संघाचा प्रवास…
स्पर्धेची सुरुवात भारतीय संघासाठी निराशाजनक झाली. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत अँड कंपनीला न्यूझीलंडकडून 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे टीम इंडियाचा मार्ग खडतर झाला. यानंतर पाकिस्तान आणि नंतर श्रीलंकेवर मोठे विजय नोंदवून संघाने उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या, पण साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले आणि भारताच्य उपांत्यफेरीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या. करा या मरो या सामन्यात कांगारू संघाने भारताचा 9 धावांनी पराभव केला. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज सपशेल फ्लॉप झाले. कर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजीत नक्कीच छाप पाडली, पण अखेरच्या षटकात तिला विजयावर शिक्कामोर्तब करण्यात अपयश आले.
त्यानंतर हरमनप्रीत आणि कंपनीच्या नजरा पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर खिळल्या होत्या. वास्तविक, किवी संघाचा पराभव आणि पाकिस्तानचा विजय यामुळे भारतीय संघाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळू शकले असते. मात्र, पाकिस्तान संघाने न्यूझीलंडसमोर अगदी सहज शरणागती पत्करली आणि यासोबतच टीम इंडियाही वर्ल्डकपमधून बाद झाली आणि टी-20 विश्वचषकाच्या 9व्या आवृत्तीतही भारतीय संघाला रिकाम्या हाताने मायदेशी परतावे लागले.





