Ind vs Eng T20 WC Semi Final: वानखेडे स्टेडियमबाहेर तिकीटाचा काळाबाजार; एकाला अटक, तब्बल ‘इतक्या’ रुपयांना विकत होता तिकीट
Ind vs Eng T20 WC Semi Final: ही तिकिटे कोणत्या स्रोतातून मिळवली आणि शहरातील मोठ्या क्रिकेट सामन्यांभोवती तिकीट काळाबाजाराचे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Ind vs Eng T20 WC Semi Final: आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीच्या (सेमीफायनल) तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका इसमाला मुंबई क्राइम ब्रँचच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव कमालुद्दीन बामणे (वय ५१) असे असून तो वानखेडे स्टेडियमवरील सामन्याची तिकिटे प्रतिकीट तब्बल ₹२५,००० या फुगवलेल्या किमतीत विकत होता.
क्रिकेटप्रेमीच्या तक्रारीनंतर सापळा –
एका क्रिकेटप्रेमीने बेकायदा तिकीट विक्रीबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर क्राइम ब्रँचने हालचाली केल्या. तक्रारीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी डॉकयार्ड रोड परिसरात बामणेला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून सेमीफायनल सामन्याची दहा मूळ (ओरिजिनल) तिकिटे आणि तिकीट विक्रीसाठी वापरला जाणारा मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
अधिकृत किमतीपेक्षा कितीतरी अधिक –
आयसीसीने ठरवलेल्या अधिकृत किमतीपेक्षा कितीतरी अधिक म्हणजे प्रतिकीट ₹२५,००० इतकी रक्कम आरोपी आकारत होता. याआधी एका क्रिकेटप्रेमीने सांगितले की, त्याने स्टेडियमबाहेरील एका काळाबाजारवाल्याकडून विजय मर्चंट स्टँडचे तिकीट ₹२०,००० ला खरेदी केले. अधिकृत बुकिंग प्लॅटफॉर्मवर तिकिटे काही मिनिटांतच संपल्याने अनेक चाहत्यांनी नाइलाजाने काळ्या बाजाराचा आधार घेतल्याचे सांगितले.
मोठ्या टोळीचा तपास सुरू
ही तिकिटे कोणत्या स्रोतातून मिळवली आणि शहरातील मोठ्या क्रिकेट सामन्यांभोवती तिकीट काळाबाजाराचे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी क्रिकेटप्रेमींना आवाहन केले आहे की, तिकिटे केवळ अधिकृत प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करावीत आणि काळाबाजारवाल्यांशी कोणताही व्यवहार टाळावा.





