Asian Champions Trophy 2024 : उपांत्य फेरीत हाॅकी इंडियासमोर आज द. कोरियाचे आव्हान…

Asian Champions Trophy 2024 (India vs Korea) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळविणाऱ्या भारतीय संघासमोर आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरिया संघाचे आव्हान असणार आहे. हा सामना आज(सोमवार,16 सप्टेंबर) दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. या लढतीत दक्षिण कोरियाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय खेळाडू उत्सुक असणार आहेत. आतापर्यंत भारताने या स्पर्धेत एकही लढत गमावली नाही.
कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यजमान चीनला ३-० असे पराभूत करून मोहिमेला सुरुवात केली. यानंतर जपानचा ५-१ आणि मलेशियाचा ८-१ असा पराभव केला. कोरियाचा ३-१ असा पराभव केल्यानंतर भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर २-१ असा विजय मिळवला.
या स्पर्धेत भारताने प्रत्येक विभागात चांगली कामगिरी केली. आघाडीची फळी , मध्यफळी व बचावफळी या तीनही आघाड्यावर भारताचे खेळाडूंनी कामगिरीत सातत्य ठेवले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मैदानी गोल करण्यास भारताला अनेक अडचणी येत होत्या. परंतु सुखजित सिंग, अभिषेक, उत्तम सिंग, गुरज्योत सिंग, अरिजित सिंग हुंडल युवा स्ट्रायकर्सनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. युवा मिडफिल्डर राजकुमार पालने देखील काही दमदार मैदानी गोल केले आहेत. याशिवाय अनुभवी मनप्रीत सिंग, उपकर्णधार विवेक सागर प्रसाद आणि नीळकांत शर्मा यांनी भक्कम बचाव करताना संघाला मोलाची मदत केली आहे.
भारताची हॉकीतील ‘द वॉल’ पीआर श्रीजेश निवृत्त झाल्यानंतर गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठक आणि सूरज कारकेरा यांनी स्पर्धेत केवळ चार गोल स्वीकारले आहेत. त्यामुळे श्रीजेशच्या निवृत्तीने निर्माण झालेली पोकळी जाणवू दिली नाही. जगातील सर्वोत्तम ड्रॅगफ्लिकर्सपैकी एक असलेल्या कर्णधार हरमनप्रीतने पॅरिसमध्ये पाच पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर करत आपला चांगला फॉर्म कायम ठेवला. हरमनप्रीतला तरुण जुगराज सिंगकडून चांगला पाठिंबा मिळत आहे.
Asian Champions Trophy 2024 : पाकिस्तानला धूळ चरत टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक…..
जिहुन यांगला रोखण्याचे आव्हान
उपांत्य फेरीचा सामना असल्याने भारत द. कोरिया संघाला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. कोरियन संघाने मलेशिया संघाविरुद्ध खेळताना पिछाडीवरून थेट बरोबरी साधली होती. याच बरोबरीने दक्षिण कोरिया संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा जिहुन यांगला रोखण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. त्यामुळे भारताला पेनल्टी कॉर्नर संदर्भात जास्त सावधानता बाळगावी लागणार आहे. दुसरा उपांत्य फेरीत यजमान चीन पाकिस्तान संघासोबत दोन हात करणार आहेत.





