China Open 2024 : उपांत्य फेरीच्या लढतीत अल्काराझ समोर मेदवेदेवचे आव्हान …

China Open 2024 : जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्काराझने सोमवारी बीजिंगमध्ये कॅरेन खाचानोव्हविरुद्ध सरळ सेटमध्ये विजय मिळवत सलग दुसऱ्या वर्षी चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्पेनच्या 21 वर्षीय अल्काराझने जागतिक क्रमवारीत 27व्या स्थानावर असलेल्या खाचानोव्हचा 7-5, 6-2 असा पराभव केला. अल्काराझने 12 पैकी चार ब्रेक पॉइंटचा फायदा घेत 96 मिनिटांत विजय मिळवला.
अल्काराजचा हा मोसमातील 46 वा विजय आहे, ज्यामुळे फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन चॅम्पियन एटीपी ‘लाइव्ह रँकिंग’मध्ये अलेक्झांडर झ्वेरेव्हला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीत (Daniil Medvedev VS Carlos Alcaraz) अल्काराझचा सामना डॅनिल मेदवेदेवशी होईल. जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या मेदवेदेवने इटलीच्या फ्लॅव्हियो कोबोलीचा 6-2,6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.
अन्य लढतीत याआधी आंद्रे रुबलेव्हने रविवारी पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात सोमवारी अलेजांद्रो डेव्हिडोविच फोकिनाचा 6-4, 7-5 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना स्थानिक खेळाडू बु युनचाओकेटशी होईल.
महिला एकेरीत आर्यना सबालेंकाने ॲश्लिन क्रुगरचा 6-2, 6-2 असा पराभव करत सलग 14 वा विजय नोंदवला. तीन वेळची ग्रँडस्लॅम विजेती सबालेंकाने ऑगस्टमध्ये सिनसिनाटी ओपनचे विजेतेपद पटकावल्यानंतर या महिन्यात यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले. तिने जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपदही पटकावले होते. सबालेंकाचा पुढील सामना मॅडिसन कीजशी होईल, जिने ब्राझीलच्या बीट्रिस हदाद माईयाचा 6-3, 6-3 असा पराभव केला.
माजी जागतिक नंबर वन नाओमी ओसाकाने केटी व्हॉलिनेट्सचा 6-3, 6-2 असा पराभव केला आणि प्री-क्वार्टर फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या कोको गॉफशी तिचा सामना होईल.
ENG vs AUS 5th ODI : हेडची अष्टपैलू कामगिरी, इंग्लंडला नमवून ऑस्ट्रेलियानं मालिकेवर केला कब्जा..
महिलाच्या अन्य लढतीत जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या जस्मिन पाओलिनीने जागतिक क्रमवारीत 45व्या स्थानी असलेल्या पोलंडच्या मॅग्डा लिनेटचा 6-4, 6-0 असा पराभव केला.





