Tambdi Jogeshwari Mandal : डोईवर तुळस, हाती टाळ-मृदुंग; गणेश विसर्जन मिरवणुकीत अवतरली पंढरीची वारी
Tambdi Jogeshwari Mandal : विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि पारंपरिक नृत्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारून गेला आहे.

पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पारंपरिक गणेशोत्सवाची भव्यता आणि पुणेकरांचा उत्साह विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळत आहे.
मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाल्यानंतर आता मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरीही विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला आहे.
लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि पारंपरिक नृत्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारून गेला आहे. त्याचबरोबर विविध गणेश मंडळांकडून सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले आहेत.
मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाच्या वतीने यंदा विशेष आकर्षण ठरले आहे. मंडळाने माउलींच्या पालखीचा रथ तयार केला असून, या रथासोबत वारकरी संप्रदायाची झलक पाहायला मिळत आहे.
डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ-मृदंग आणि मुखी हरिनामाचा गजर करत वारकरी मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांमुळे गणेश विसर्जन मिरवणुकीत जणू पंढरीची वारीच अवतरल्याचे दृश्य निर्माण झाले आहे.
गणेशोत्सव आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम साधणाऱ्या या उपक्रमाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडत असल्याने तांबडी जोगेश्वरीची मिरवणूक विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.





