मुंबई – पठाण आणि केरला स्टोरी सारखे सिनेमे सोडले तर आजही बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर गटांगळ्या खाताना दिसत आहे. याउलट प्रदर्शित झालेले बहुतांशी साऊथ चित्रपट बजेट पेक्षा अधिक कमाई करताना दिसत आहेत. साऊथ स्टारर बरेच चित्रपट हल्ली देशभर आणि विदेशात प्रदर्शित होताना दिसतात. यामुळेच हे चित्रपट कमाईच्या बाबतीत भरगोस यश मिळवतात. 2018 हा चित्रपट त्याचाच एक भाग. ज्याची कमाई ऐकून सध्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतोय.
2018 या चित्रपटात एक खरी घटना पडद्यावर मांडण्यात आली आहे. ज्यामुळे या चित्रपटाचे कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. मुळात मल्याळम भाषेत असलेल्या या चित्रपटाचा आशय प्रेक्षकांना चांगलाच भावताना दिसत आहे. म्हणूनच दिवसेंदिवस चित्रपटाचे कलेक्शन देखील वाढत चालले आहे.
‘2018 एव्हरी वन इज हिरो भारतातच नाही तर जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने 9 व्या दिवशी एकट्या केरळमधून सुमारे 5.18 कोटींची कमाई केली आहे जो मॉलीवुडच्या इतिहासात आजपर्यंतचा विक्रम आहे. तर पहिल्या 9 दिवसात या चित्रपटाने जगभरात 80 कोटींहून अधिक गल्ला कमावला आहे.
मॉलीवूडच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाला रिलीजच्या दिवसापासून एवढा उदंड प्रतिसाद मिळत आहे. 2018 हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला आहे जो जुड अँथनी जोसेफ दिग्दर्शित आहे. लवकरच चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमधे दाखल होणार आहे.
या चित्रपटात टोविनो थॉमस, आसिफ अली, कुंचाको बोबन, विनीत श्रीनिवासन, अपर्णा बालमुरली आणि तन्वी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या पुराबद्दल आहे. ‘2018 एव्हरी वन इज हिरो’ या चित्रपटाचे एकूण बजेट बारा कोटी इतके होते. चित्रपटाने चांगली कमाई केल्याने प्रोडक्शन टीमचे खूप कौतुक होत आहे.