Madhuri Elephant Kolhapur : महादेवी हत्तीण पुन्हा नांदणीत परतणार? वनतारा सीईओ कोल्हापुराला भेट देणार? हालचालींना वेग…

Madhuri Elephant Kolhapur : कोल्हापूरच्या नांदणी मठातील ३६ वर्षीय महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा पशु कल्याण केंद्रात हस्तांतरित करण्यात आल्यानंतर नांदणी गावात आणि परिसरात तीव्र नाराजी पसरली आहे. ३० जुलै २०२५ रोजी मध्यरात्री पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आणि प्राणी रुग्णवाहिकेतून महादेवीला वनताराला पाठवण्यात आले.
या हस्तांतरणावेळी गावकऱ्यांनी भावपूर्ण निरोप देत मिरवणूक काढली, परंतु त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात असंतोष होता. आता महादेवीला पुन्हा नांदणीला आणण्यासाठी ग्रामस्थ, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे.
यात काँग्रेस नेते सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या स्वाक्षरी मोहिमेने वेग घेतला आहे, तर वनतारा प्रकल्पाचे सीईओ विहान करणी आणि त्यांची टीम नांदणीला भेट देण्यासाठी कोल्हापूरला येत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
कोल्हापुरात स्वाक्षरी मोहिम
महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणीला आणण्यासाठी २४ तासांत १,२५,३५३ लोकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला आहे. ही मोहीम शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, शनिवारी (२ ऑगस्ट) सकाळी १० वाजता नांदणी मठाचे स्वामीजी यांच्या हस्ते या स्वाक्षरी फॉर्मचे पूजन होणार आहे.
त्यानंतर दुपारी १ वाजता कोल्हापूरच्या रमणमळा पोस्ट ऑफिसमधून हे फॉर्म स्पीड पोस्टद्वारे राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवले जाणार आहेत, अशी माहिती सतेज पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. या मोहिमेला सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि कर्नाटक सीमावर्ती भागातील अनेक ग्रामपंचायतींनी पाठिंबा दर्शवला असून, त्यांनी वनतारा आणि अंबानी यांच्या विरोधात ठराव मंजूर केले आहेत.
वनताराचे सीईओ स्वामीजींची भेट घेणार?
मिळालेल्या माहितीनुसार, वनतारा प्रकल्पाचे सीईओ विहान करणी आणि त्यांची टीम कोल्हापूर विमानतळावर येऊन नांदणी मठात स्वामीजींची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे महादेवी पुन्हा नांदणीला परत येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. मात्र, ही भेट केवळ चर्चेसाठी आहे की प्रत्यक्ष निर्णयासाठी, याबाबत स्पष्टता नाही. ग्रामस्थ आणि स्थानिक नेत्यांनी महादेवीच्या हस्तांतरणाविरोधात तीव्र आंदोलन केले असून, काहींनी जिओ सिमकार्ड पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे अंबानींच्या वनतारा प्रकल्पाविरोधातील नाराजी स्पष्ट दिसते.
म्हणून महादेवीला वनताराला हलवलं
महादेवी हत्तीण १९९२ पासून नांदणी मठात होती आणि ती गावाची सांस्कृतिक शान मानली जात होती. मात्र, पेटा इंडियाने (PETA India) तिच्या आरोग्याबाबत तक्रार दाखल केली, ज्यात तिला फूट रॉट, वाढलेली नखे, संधिवात आणि मानसिक तणावाची लक्षणे (जसे की डोके हलवणे) आढळल्याचे नमूद केले.
यानंतर वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन आणि अपुरी काळजी यामुळे उच्चस्तरीय समितीने (HPC) तिचे वनताराला हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला. १६ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला, ज्यात प्राण्यांच्या कल्याणाला धार्मिक प्रथांपेक्षा प्राधान्य देण्याचे नमूद केले. सुप्रीम कोर्टाने २८ जुलै २०२५ रोजी मठाच्या याचिकेला फेटाळल्याने ३० जुलैला महादेवी वनताराला रवाना झाली.




