“कोल्हापूरकरांना त्रास झाला असेल…”; वनताराकडून दिलगीरी, महादेवीसाठी कोल्हापूरजवळ पुनर्वसन केंद्र उभारणार
mahadevi elephant । Vantara – गुजरातच्या जामनगरमध्ये असलेल्या वनतारा या प्राणी पुनर्वसन केंद्राने, बुधवारी राज्य सरकार व जैन मठ यांच्याशी समन्वय साधून कोल्हापूरजवळ महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वनताराच्या टीमशी या संदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार पुनरावलोकन याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले होते. त्याला देखील वनताराच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वनतारा ही संस्था सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानूसार काम करत आहे. महादेवीचा ताबा घेण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. राज्याच्या वन विभागाने निवडलेल्या ठिकाणी महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र देखील बांधण्याची तयारी वनताराने दर्शवली असून त्याचा प्रस्ताव देखील त्यांनी दिला आहे, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
वनताराच्या वतीने राज्य शासनाकडे महादेवीसाठी पुनर्वसन केंद्राच्या निर्मितीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामध्ये, वनतारा हे जैन मठ व कोल्हापूरच्या लोकांसाठी महादेवीचे सखोल धार्मिक व सांस्कृतीक महत्व मान्य करते. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या व खोलवर रुजलेल्या आध्यात्मिक पद्धती व सामुदायिक जीवनाचा महादेवी भाग आहे.
त्यामुळेच आम्ही कोल्हापुरजवळ महादेवीसाठी पुनर्वसन केंद्राचा प्रस्ताव दिला असून हे पुनर्वसन केंद्र प्राणी तज्ञांशी सल्लामसलत करुन, प्राणी कल्याण मार्गदर्शन तत्वांच्या आधारे उभारण्यात येईल, जे हत्तींच्या काळजीसाठी आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगत असेल असे त्यांनी प्रस्तवात म्हटले आहे.
वनताराकडून दिलगीरी !
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने वनताराने महादेवीचे कोल्हापुरातून वनतारामध्ये स्थलांतर केले होते. त्यानंतर अनेकांनी या गोष्टीला जोरदार विरोध दर्शविला होता. त्यामुळे अनेकांनी सोशल मिडीयाद्वारे या गोष्टीचा निषेध देखील दर्शविला होता.
न्यायालयाच्या आदेशाने आम्ही यामध्ये सहभागी झालो आहोत. यामुळे जैन समुदायाला किंवा कोल्हापुरच्या नागरिकांना काही त्रास झाला असेल तर आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असे देखील त्यांनी स्पष्ट करताना, या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली.
महादेवीसाठी काय असणार पुनर्वसन केंद्रामध्ये :
– पुर्ण पशुवैद्यकिय सहाय्य
– सांधे आणि स्नायूंना आराम देण्यासाठी एक विशेष हायड्रोथेरपी तलाव
– पोहण्यासाठी दुसरा तलाव व मोठा जलाशय
– शारीरिक पुनर्वसनासाठी लेसर थेरपी आणि उपचार कक्ष
– विश्रांती आणि संरक्षणासाठी आच्छादित रात्रीचा निवारा





