Mahadevi Elephant : महादेवी मठात परतणार? वनतारा अन् राज्य सरकारच मोठं पाऊल, नांदणीत पुनर्वसन केंद्र उभारणार?

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणला पुन्हा मठात परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि वनतारा पुनर्वसन केंद्र एकत्र येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ६ ऑगस्ट रोजी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.
या चर्चेत वनताराने महाराष्ट्र सरकारच्या सर्वोच्च न्यायालयातील पुनर्विचार याचिकेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, नांदणी मठाजवळ वन विभागाने निवडलेल्या जागेवर महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर म्हटले आहे की, “वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला आहे.
वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली.
महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.
या… pic.twitter.com/GOSc9ovVVM— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 6, 2025
त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची बैठक सफल?
महादेवी हत्तीण प्रकरणात निर्माण झालेल्या जनआक्रोशाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, तसेच नांदणी मठाचे प्रतिनिधी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, सतेज पाटील, सदाभाऊ खोत, धैर्यशील माने उपस्थित होते.





