विधानसभा निवडणूक लढणार का? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका

Chandrashekhar Bawankule | विधानसभा निवडणूकांचे बिगुल अखेर वाजले आहे. त्यानुसार आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी कामठी मतदारसंघातून लढणार की नाही याबाबत भाष्य केले आहे. या निवडणुकीत स्वतःसाठी उमेदवारी मागितली नाही आणि मागणारही नाही. कामठी मतदारसंघांतून लढणार नाही, पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणार, असे त्यांनी जाहीर केले आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?
“या निवडणुकीत स्वतःसाठी उमेदवारी मागितलेली नाही आणि मागणारही नाही. 15 वर्षे या मतदारसंघाचा आमदार होतो. पाच वर्षांपूर्वी मी निवडणूक लढवणार होतो. मात्र, तेव्हा पक्षाने सांगितले की पक्षाचे काम करा. आताही पक्ष अध्यक्ष म्हणून मी पक्षाचे काम करत आहे. केंद्रीय निवडणूक समिती काय निर्णय करेल, मला माहिती नाही. मात्र, कामठी विधानसभा मतदारसंघात कोणत्याही उमेदवार दिला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडेल,” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
2019 मध्ये बावनकुळेंचे तिकीट कापले
कामठीत भाजपचे टेकचंद सावरकर विद्यमान आमदार आहेत. 2019 मध्ये बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी दिली नव्हती, त्यामुळे आता बावनकुळे कामठीतून लढणार का? याबाबत चर्चा सुरू होती. मात्र बावनकुळे यांनी स्वतः याबाबत भूमिका स्पष्ट केली. Chandrashekhar Bawankule |
पुढे ते म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय चर्चा झाली त्याबद्दल मला माहिती नाही. मात्र एकनाथ शिंदे असो की अजित पवार यांनी जर त्याग केले असेल तर आमच्या पक्षाने त्याग केला आहे. सर्वाधिक आमदार आमच्याकडे आहे. त्यामुळे कोणी किती मोठा त्याग केला हे महत्त्वाचे नाही तर महायुतीचे नुकसान होऊ नये यासाठी तीनही नेत्यांनी समन्वय ठेवत आणि मोठे मन करत आमच्या पाठिशी त्यांनी उभे राहिले पाहिजे. Chandrashekhar Bawankule |
“कोणाचा त्याग किती मोठा आणि महत्त्वाचा आहे, हे मोजण्याची आज गरज नाही. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेकडे आहे तर जास्तीत जास्त आमदार आमच्याकडे आहे. त्यामुळे महायुतीचे नुकसान होऊ नये याची काळजी घेत सत्तेतील काही महामंडळ हे भाजपकडे असावे. महायुतीमधील ताणतणाव निवडणुकीच्या काळात परवडणारे नाही. महायुती एकत्रित राहणार असून ती जिंकण्यासाठी लढणार,” असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा:





