महायुतीत पुन्हा धुसफुस; विधिमंडळ समित्यांवरून एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या आमदारांना वगळले

मुंबई : पालकमंत्रीपदाचा वाद अजून मिटलेला नाही. ओएसडी आणि खासगी सचिवांच्या नियुक्तीवरुन मुख्यमंत्र्याच्या हस्तक्षेपाने महायुतीमध्ये धुसफूस सुरु आहे. त्यातच आता महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांवर आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भाजपच्या 11 आमदारांची विविध समित्यांवर नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांना स्थान देण्यात आलेले नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मित्रपक्षाच्या आमदारांना योग्य प्रतिनिधीत्व दिले जाईल, असे म्हटले आहे. मात्र महायुतीतील प्रमुख दोन घटक पक्षांच्या आमदारांना वेटिंगवर ठेवण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भाजपच्या आमदारांची विविध समित्यांवर नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सध्या 11 आमदारांची नावे समोर आली आहे. मोनिका राजळे (महिला हक्क आणि कल्याण समिती), नमिती मुंदडा (धर्मदाय खासगी रुग्णालय चौकशी समिती), राम कदम (विशेष हक्क समिती), अतुल भातखळकर (मराठी भाषा समिती), किसन कथोरे (इतर मागासवर्गीय कल्याण समिती), नारायण कुचे (अनुसूचित जाती कल्याण समिती), राजेश पाडवी (अनुसूचित जमाती कल्याण समिती), रवी राणा (आश्वासन समिती), संतोष दानवे (पंचायत राज समिती), राहुल कुल (सार्वजनिक उपक्रम समिती) आणि सचिन कल्याणशेट्टी (आमदार निवास व्यवस्था समिती) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महायुतीमध्ये सरकार स्थापनेपासून विविध वाद समोर येत आहेत. सुरुवातीला मुख्यमंत्री पद, त्यानंतर मंत्रिमंडळाता कोणाची निवड, त्यानंतर खातेवाटप आणि पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही शमलेला नाही. त्याततच आता ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, त्यांची विविध समित्यांवर वर्णी लावली जात आहे. त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जात असल्याची चर्चा आहे.





