Champions Trophy 2025 : ईसीबीचे अध्यक्ष थॉम्प्सन यांचे चॅम्पियन्स ट्राफीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले “हायब्रीड मॉडेल हा एकमेव पर्याय, भारताशिवाय…”

Champions Trophy 2025 : – आगामी वर्षाच्या सुरुवातीला आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात येणार आहे. या स्पर्धेत क्रिकेटमधील अव्वल आठ संघ सहभागी होतात. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान मधील तणावपूर्ण संबंधामुळे भारताने 2008 पासून पाकिस्तानमध्ये भारतीय संघ पाठविलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेत भारत कशा प्रकारे सहभागी होणार याची उत्सूकता आहे.
सध्याच्या घडीला पाकिस्तान व इंग्लंड यांच्या दरम्यान कसोटी मालिका सुरु असून या इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिचर्ड थॉम्प्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गोल्ड हे सध्या पाकिस्तानमध्येच आहेत. रिचर्ड थॉम्प्सन यांनी भारताशिवाय चॅम्पियन्स करंडक शक्य नसल्याचे म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर भारतीय संघ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाऊ शकतो. मात्र, सरकार संघ पाठविण्यास बीसीसीआयला परवानगी देण्याची शक्यता नसल्याने, अशा वेळी केवळ हायब्रीड मॉडेल हाच पर्याय दिसत असल्याचे थॉम्प्सन यांनी ईएसपीएन क्रिक इन्फोशी बोलताना संगितले. हायब्रीड मॉडेलमध्ये भारत सर्व लढती तिसऱ्या देशात खेळून बाकी इतर सामने पाकिस्तानमध्ये होऊ शकतात.
जय शहा यांची महत्वाची भूमिका
बीसीसीआयचे सचिव असलेले जय शहा डिसेंबर महिन्यात आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. जय शहा यांची ऑगस्टमध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. जय शहा यांना मोठी भूमिका बजावावी लागणार आहे. दोन्ही देशामध्ये भूराजनीती आहे. त्यानंतर क्रिकेटमध्ये देखील राजकारण आहे. मात्र, जय शहा यातून योग्य तो मार्ग काढतील असा विश्वास रिचर्ड थॉम्प्सन यांनी बोलताना व्यक्त केला.
भारताच्या निर्णयाची प्रतीक्षा
पाकिस्तान चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे यजमान राष्ट्र आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारत सहभागी होणार की नाही, याचीच आम्ही वाट पाहात आहोत. भारताने या स्पर्धेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा पाकिस्तान आहे. मात्र तसे झाले नाही तर इतर पर्याय मान्य करावेच लागतील, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गोल्ड यांनी बोलताना सांगितले. विश्वकरंडक किंवा आशियाई अशा स्पर्धामध्ये भारत व पाकिस्तान संघ एकमेकांसमोर खेळतात, त्यामुळे या स्पर्धेत देखील भारत सहभागी होईल, असे गोल्ड म्हणाले.
क्रिकेटमधील अव्वल संघानी अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळले आहे. असे असले तरी पाकिस्तानने 1996 मध्ये आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. 1996 साली विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानने भारत व श्रीलंकेसह सहयजमानपद भूषविले होते. त्यानंतर आयसीसीची कोणतीच स्पर्धा पाकिस्तानमध्ये घेण्यात आली नाही. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे अव्वल आठ संघ सहभागी होणार आहेत.





