Chhagan Bhujbal – विमान अपघात तपास विभागाच्या (एएआयबी) प्राथमिक अहवालात दिवंगत अजित पवार यांना घेऊन जाणारे चार्टर्ड विमान बारामतीमध्ये कोसळण्यापूर्वी काही झाडांवर आदळले असल्याचे म्हटले आहे. पण, असे घडताना कोणीही का पाहिले नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. एएआयबीच्या प्राथमिक अहवालानुसार, जवळच्या गावात बसवलेल्या कॅमेऱ्यांमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान उजवीकडे वळताना आणि धावपट्टीच्या पृष्ठभागापेक्षा कमी उंचीवर असलेल्या जमिनीवर कोसळण्यापूर्वी काही झाडांवर आदळताना दिसून आले आणि पडल्यानंतर लगेचच आगीत जळून खाक झाल्याचे म्हटले आहे. मला आश्चर्य वाटते, जर विमान झाडांवर आदळले असते तर कोणीतरी ते पाहिले असते, असे पत्रकारांशी बोलताना भुजबळांनी म्हटले आहे. २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये लियरजेट ४५ हे विमान कोसळले. यामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता.