Ganesh Visarjan Pune : ‘एवढाच निरोप सांगा बाप्पाला…’; गणेश विसर्जनादिवशी अजित पवारांची आठवण, पुण्यातील बॅनरने वेधले लक्ष
Ganesh Visarjan Pune : गणेश विसर्जनाच्या या उत्साहाच्या वातावरणात पुण्यातील अलका चौकात लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पुणे : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुण्यनगरीत आज उत्साहाचे आणि भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले असून, मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
मिरवणुकीच्या मार्गावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या असून, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे.
गणेश विसर्जनाच्या या उत्साहाच्या वातावरणात पुण्यातील अलका चौकात लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरवर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो असून, ‘एवढाच निरोप सांगा बाप्पाला, परत पाठवा आमच्या दादाला!’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
अलका चौकातील गणेश मंडळाशेजारी लावण्यात आलेल्या या बॅनरमधून अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात अजित पवार यांचा पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवांशी असलेला सहभाग अनेकदा चर्चेत राहिला होता.
यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील एका गणेश मंडळाने ‘अजितसृष्टी’ या संकल्पनेवर आधारित देखावाही सादर केला होता. या देखाव्याची मोठी चर्चा झाली होती.
दरम्यान, गणरायाला निरोप देताना भाविकांमध्ये उत्साहासोबतच भावनिक वातावरणही पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या बॅनरमुळे त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्येही भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत.
Food Adulteration: ‘अन्न भेसळीच्या राक्षसाला पायदळी तुडवा!’; मंडईतील रांगोळीतून सामाजिक संदेश





