Sunetra Pawar : अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका; सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?
Sunetra Pawar : आता प्रचाराला वेग आला असून प्रचाराचा श्रीफळ वाढवल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

Sunetra Pawar : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. ऐनवेळी दादांचे निकटवर्तीय आणि विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आता प्रचाराला वेग आला असून प्रचाराचा श्रीफळ वाढवल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
“ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे, त्यांनी अजितदादांचे नाव वापरणे बंद करावे. दादांच्या कुटुंबावर नाराज होऊन बाहेर पडले असतील, तर स्वतःच्या नावावर, कामावर आणि कर्तृत्वावर निवडणूक लढवावी.” असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. एकप्रकारे अजित दादांचे नाव आणि फोटो न वापरता स्वकर्तृत्वावर निवडणूक लढण्याचा थेट इशारा जगताप यांना सुनेत्रा पवारांनी दिला.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ आज तुम्ही या ठिकाणी आला आहात. गर्दी पाहून माझा ऊर भरून आला आहे. दादांच्या प्रेमापोटी विजय निश्चीत होता. अजितदादांच्या नंतरच्या निवडणुकीसाठी हा प्रतिसाद हा आधार महत्वाचा असल्याचे देखील सुनेत्रा पवार म्हणाल्या.
सोमेश्वर कारखाना डबघाईला आला होता. पण….
“दादांचा जाऊन एकही वर्ष झालं नाही. बांध सुना झाला. शेती सुनी झाली. प्रत्येक ठिकाणी त्यांचा आठवणी आहेत. दादांचा सोमेश्वरवरती पोटच्या पोरांप्रमाणे जीव होता. अत्यंत तरुणपणी दादांनी छत्रपती कारखान्यातून राजकीय सुरुवात केली. दादा स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्याच्या गरजा तळमळ शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे या साठी दादांचे प्रयत्न सुरू होते. १९९२ साली सोमेश्वर सहकारी साखर कारखाना दादांच्या ताब्यात आला. अलीकडच्या काळात सोमेश्वर कारखाना डबघाईला आला होता. पण दादांनी त्यासाठी आमदारकी पणाला लावली. दादांनी कधी स्वतःची पाठ थोपटून घेतली नाही.” अशी आठवणही सुनेत्रा पवार यांनी सांगितली.
सुनेत्रा पवारांचे आवाहन
चेअरमन हा नाव गाजविणारा नसेल तर भाव गाजविणारा असेल. ११ तारखेला आपलं चिन्ह आहे कपबशी जास्तीत जास्त सभासदानी मतदान करावे, असे आवाहन सुनेत्रा पवारांनी मतदारांना केले. यामुळे आता प्रत्यक्षात निवडणुकीत काय काय घडते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी अजितदादा, राष्ट्रवादी शरद पवार आणि भाजपच्या पाठिंब्यावर पुरूषोत्तम जगताप यांचे पॅनल आहे.






