Flydubai Pilot Attack : विमानाचा ताबा घेणाऱ्या व्यक्तींबद्दलची माहिती अंधारातच
या हल्ल्याच्या घटनेनंतर विमानातील पुढच्या सीटवर बसणाऱ्या एका प्रवाशाने आपल्या मनोगतात या प्रशिक्षित कर्मचाऱ्याचा ओझरता उल्लेख केला होता.

Flydubai Pilot Attack – फ्लाय दुबई विमानात सहवैमानिकाने हल्ला केल्यानंतर अनियंत्रित झालेल्या विमानाला पुन्हा स्थिर करणाऱ्या अज्ञात वैमानिकांबद्दलची माहिती अजूनही अंधारातच आहे. या हल्ल्याच्या घटनेला तीन दिवस होऊन गेल्यानंतर देखील या अज्ञात प्रशिक्षित वैमानिकांबद्दलची माहिती उजेडात आणली गेलेली नाही.
फ्लाय दुबई विमान कंपनीने या अज्ञात कर्मचाऱ्यांचा उल्लेख या विमानातून प्रवास करणारे केवळ ऑन ड्युटी क्रू मेंबर्स असाच केला आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर विमानातील पुढच्या सीटवर बसणाऱ्या एका प्रवाशाने आपल्या मनोगतात या प्रशिक्षित कर्मचाऱ्याचा ओझरता उल्लेख केला होता.
प्रशिक्षित कर्मचाऱ्याने वेगाने हालचाली केल्या. त्यामुळेच विमानातील सर्व प्रवाशांसह विमान पुन्हा स्थिरपणे उडत राहू शकले. हा एक चमत्कारच होता, असे या विमानातील एक प्रवासी डॅनिओएल स्लिच्टर यांनी सांगितले.
प्रत्येक विमानात दोन जास्तीचे प्रशिक्षित वैमानित असत नाहीत. मात्र या विमानात असे वैमानिक होते. विमान तेल अवीववरून दुबईला परत आणण्यासाठी कदाचित त्यांना बरोबर घेतले गेले असावे. कदाचित त्यांना बरोबर घेतले जाण्यामागचे हे एकमेव कारण असावे. अशा व्यवस्थेला डेडहेडिंग म्हणतात.
कॉकपिटमध्ये काही तरी भयानक चालले आहे, हे लक्षात आल्यावर प्रवाशांनी आरडाओरड करायला सुरुवात केली होती. तेंव्हा हे दोन प्रशिक्षिक वैमानिक कॉकपिटच्या दिशेने धावले. रक्तबंबाळ झालेल्या कॅप्टनने कॉकपिटचा दरवाजा उघडल्यानंतर अन्य प्रवाशांच्या मदतीने या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी हल्लेखोर वैमानिकाला पकडले.
दोघांपैकी एका वैमानिकाने तर हल्लेखोर वैमानिकाला ओढून बाहेर काढले आणि कॉकपिटमध्ये शिरून कंट्रोलचा ताबा घेतला. त्याने अक्षरशः दहशतवाद्याच्या अंगावरून उडी घेतली होती. त्याच्या पाठोपाठ अन्य वैमानिक देखील आत गेला आणि त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला होता, असेही या प्रवाशाने सांगितले.
सुमारे १० मिनिटांनी विमान पुन्हा स्थिर झाल्याचे समजले आणि नंतर विमान सुखरुपपणे उतरवले गेले. तोपर्यंत इतर कर्मचारी आणि प्रवाशांना हे दोघे कोण आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का नाही, हे पण लक्षात आले नव्हते. पण त्यांच्यावर विश्वास ठेवण्यावाचून पर्यायही नव्हता.





