“कोण खासदार असतील किंवा त्यांचे पीए…; बीडच्या लेकीसाठी आमदार सुरेश धस मैदानात; या मागण्या करत म्हणाले…

Suresh Dhas : महाराष्ट्राला हादरवरून सोडणारी घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात घडली. या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका २८ वर्षीय महिला डॅाक्टने आत्महत्या करत आपले जीवन संपवले. आपल्यावर चार वेळा अत्याचार झाला असून, आपल्याला मानसिक त्रास झाल्याचे महिलेने तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. आता या घटनेत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
महिलेने आत्महत्यापूर्वी तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख केला होता. यापैकी एक आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी आज पुण्यातून पहाटे चारच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्या पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. ही महिला डॅाक्टर मूळची बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
काय म्हणाले आमदार सुरेश धस?
या प्रकरणात अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या असून आता आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. पोटाला चिमटा घेऊन ऊस तोडून आमचे लोक लेकीबाळीला शिकवतात.
हेही वाचा : IND vs AUS : संघ बदलला, कर्णधार बदलला, पण तरी संपेना साडेसाती! भारताने सलग १८व्यांदा केला ‘हा’ नकोसा विक्रम
त्याचा जर असे लोक गैरफायदा घेणार असतील तर जरब बसली पाहिजे इथून पुढे असे प्रकरण होता कामा नये, असेही त्यांनी म्हटले. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालले पाहिजे, अशी मागणी करत यासाठी एसआयटी स्थापन झाली पाहिजे, असे सुरेश धस यांनी सांगितले. महिलेची तक्रार न घेणारे उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील ते सगळे यामध्ये आरोपी झाले पाहिजेत, अशीही मागणी सुरेश धस यांनी केली आहे.
महिला मृत्यू प्रकरणात खासदार अन् पीए अशी माहितीही समोर येत आहे. यावर भाष्य करताना सुरेश धस म्हणाले, कोण खासदार असतील किंवा त्यांचे पीए दबाव टाकणारे असतील, हे तपासात पुढे येईल, जर तसे आढळून आल्यास त्यावर कारवाई झाली पाहिजे.
सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप
२८ वर्षीय डॅाक्टर महिला मृत्यू प्रकरणात तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने तिच्यावर चार वेळा अत्याचार केला. तसेच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीनेही तिला मानसिक त्रास दिला असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
एकाला अटक, दुसरा फरार
आरोग्य विभागातील वरिष्ठ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकांकडे तक्रार केली असता त्यांनी दखल घेतली नाही, असे नमूद केले आहे. पोलिसांनी आरोप असणाऱ्या दोन पैकी एका आरोपीला अटक केली असून, दुसरा आरोपी अद्याप फरारच आहे.
हेही वाचा : Zaira Wasim: ‘दंगल’ चित्रपटातून चमकलेली जायरा वसीम आता पडद्यापासून दूर; रवीना टंडन झाल्या होत्या नाराज





