Suresh Dhas Son Car Accident : ‘माझ्या मुलाला व्यसन नाही, अपघातानंतर कायदेशीर कारवाई सुरू’; सुरेश धसांचं स्पष्टीकरण

Suresh Dhas Son Car Accident : अहमदनगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपा शिवारात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या भरधाव कारने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने ३४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. नितीन शेळके (वय ३४, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) असं अपघातात मृत्य झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या अपघातामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, पोलिसांनी सागर धस आणि त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जातेगाव घाट फाट्याजवळ घडली आहे. त्यानंतर आता आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबत भाष्य केलं आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
सुरेश धस म्हणाले, माझ्या मुलावर रीतसर गुन्हा दाखल झाला आहे. तो मुंबईला एका ट्रिटमेंटसाठी येत होता. अहिल्यानगर जिल्ह्यात अपघात झाला आहे. शेळके नावाच्या तरुणचा या अपघातात मृत्यू झाला आहे. माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही. त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्हचा अजिबात विषय नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काल सायंकाळी साडेपाच वाजता त्याची सुटका झाली आहे, असं सुरेश धस यांनी यावेळी सांगितले.
नेमकं काय घडलं?
नितीन शेळके हे आपल्या दुचाकीवरून जातेगाव फाट्याकडून पारनेरच्या दिशेने जात होते. यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या सागर धस याच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, नितीन शेळके गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघातावेळी सागर सुरेश धस (रा. आष्टी, जि. बीड) आणि त्याचा सहकारी सचिन दादासाहेब कोकणे (रा. तवलेवाडी, ता. आष्टी, जि. बीड) हे दोघेही चारचाकी वाहनात होते, अशी माहिती सुपा पोलिसांनी दिली आहे. सागर धस हा भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा असल्याने या प्रकरणाने राजकीय रंग घेतला आहे.





