Sajjan Jindal : भारतीय सुप्रसिद्ध उद्योगपती आणि जिंदाल स्टील वर्क्स समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीनुसार जिंदाल यांच्याविरोधात मुंबईच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी बलात्कार केल्याच्या आरोपाखाली उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता जिंदाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र जिंदाल यांनी सर्व आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे.
सज्जन जिंदाल यांच्यावर एका 30 वर्षीय महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादवि 376 (बलात्कार), कलम 354 आणि कलम 503 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, जानेवारी 2022 मध्ये उद्योगपती सज्जन जिंदालकार्यालयात ही घटना घडली होती. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिंदाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता बीकेसी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र याअ सगळ्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले सज्जन जिंदाल नेमके आहेत कोण? हे जाणून घेऊयात.
‘स्टील मॅन’ म्हणून ओळखले जाणारे सज्जन जिंदाल दिसतील दुसरी मोठी स्टील कंपनी, JSW अर्थात जिंदाल स्टील वर्क्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असून त्यांनी आपली आई आणि देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांच्याकडून व्यवसायाबाबत संपूर्ण माहिती करून घेतली. सावित्री जिंदाल यांनी केवळ व्यवसायाची जबाबदारी घेतली नाही तर पतीचा राजकीय वारसाही पुढे नेला. त्यांच्या नेतृत्वाखाली जिंदाल ग्रुपने बरीच प्रगती केली. त्या स्वतः हरियाणाच्या हिसार विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आणि मंत्रीही झाल्या. त्यांचा धाकटा मुलगा नवीन जिंदालही खासदार झाला. सावित्री यांनी या व्यवसायाची पृथ्वीराज जिंदाल, सज्जन, रतन आणि नवीन जिंदाल या चार मुलांवर जबाबदारी सोपवली.
कोण आहेत सज्जन जिंदाल?
सज्जन जिंदाल यांचा १९५९ मध्ये जन्म झाला. सज्जन यांना बालपणापासूनच व्यवसायात रुची होती आणि १९८२ मध्ये जिंदाल समूहात रुजू झाले. २००५ मध्ये त्यांच्या वडिलांच्या हेलिकॉप्टर अपघातात अकस्मात निधन झाले. त्यानंतर आई सावित्री जिंदाल यांनी कंपनीला यशाकडे नेले. सोबतच त्यांनी राजकीय वारसाही वाढवला. आज सज्जन जिंदाल भारतातील दुसरी सर्वात मोठी स्टील कंपनी JSW स्टील लिमिटेडचे प्रमुख आहेत.
जिंदाल यांची संपत्ती किती आहे?
फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, सज्जन जिंदाल यांची आई सावित्री जिंदाल सुमारे १,९९,६५६ कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. Trendlyne नुसार, सज्जन जिंदाल यांनी १२ शेअर्समध्ये पैसे गुंतवले आहेत, ज्याचे एकूण किंमत ३९,२६३ कोटी रुपये आहे. तर त्यांची एकूण संपत्ती १,८०,००० कोटी रुपये इतकी आहे.
काय आहे महिलेचा दावा ?
महिलेने असा दावा केला की, ती काही वर्षांपूर्वी दुबई येथे एका क्रिकेट सामन्यात जिंदालयांना भेटली होती, त्यानंतर त्यांची मैत्री झाली त्यानंतर सज्जन जिंदाल तिच्याकडे आकर्षित झाले. दुबई स्टेडियमच्या व्हीआयपी बॉक्समध्ये जिंदाल यांना पहिल्यांदा भेटल्याचा दावा महिलेने केला आहे. पीडीतेचा भाऊ हा मालमत्ता सल्लागार होता आणि जिंदाल यांना तिच्या भावाकडून मालमत्ता खरेदी करण्यात रस असल्याने ही भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी फोन नंबरची देवाणघेवाण केली.
पुढे तिने दावा केला आहे की, मुंबईतील बीकेसीतील कार्यालयात भेटायला बोलावले होते. यावेळी पीडीत महिला संध्याकाळी 7 च्या सुमारास त्यांच्या कार्यालयात पोहोचली होती. या दरम्यान इमारतीच्या पेंटहाऊसमध्ये आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडीत महिलेने केला आहे. तसेच आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचेही वचन दिल्याचे पीडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे.