नवी दिल्ली – मित्रांमध्ये थोडी फार थट्टा मस्करी चालतेच. एकमेकांना गंमतीत मारणे, चिडवणे किंवा भीती दाखवणे नेहमीच चालते. मात्र कधी कधी आपली छोटीशी मस्करी एखाद्या जीवावर बेतते. असाच काहीसा जीवावर बेतलेला किस्सा दिल्लीत घडला आहे. या घटनेत दोन मित्रांना जीव गमवावा लागला आहे.
टेरेसवर एकमेकांना गुदगुल्या करताना दोन मित्रांचा तोल गेला आहे. टेरेसवरून पडून दोन मित्रांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने दिल्ली हादरली आहे. या घटनेनंतर दोघांनाही तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे.
दिल्लीच्या गीता कॉलनी परिसरात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मरण पावलेले दोन्ही मित्र एकाच फॅक्टरीत काम करणारे होते. दोघं मित्र दुपारच्या वेळेस फॅक्टरीच्या टेरेसवर जेवण करण्यासाठी गेले होते. जेवताना ते थट्टा-मस्करी करत होते. मात्र थोड्यावेळाने त्यांनी एकमेकांना गुदगुल्या करायला सुरूवात केली. त्याचवेळी दोघांचा तोल जाऊन ते अचानक टेरेसवरुन खाली पडले. शफिक आणि शकिल अशी या दोघांची नाव असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. शफिक आणि शकिल दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. येथील रेडीमेड कपड्यांचा फॅक्टरीत ते कामाला होते.