प्रशांत जेधे
शरद जचकर यांनी लिहिलेली कादंबरी “दि मिस्टरी ऑफ डिमेटर’ विषयी…
दोन हजार वर्षांपूर्वी ग्रीस देशामध्ये घडून गेलेल्या एका सत्तासंघर्षातून दोन पंथात झालेले गैरसमज. त्यातून एका पंथास पिढ्यान्पिढ्या भोगाव्या लागणाऱ्या आरोपातून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करणारा इंडस हेलेनिक पंथ आणि त्यास विरोध करणारा दुसरा डाएनिश पंथ! अशा या दोन गुप्तपंथाची ही संघर्ष कथा. वर्षानुवर्षे इंडस हेलेनिक पंथास देशद्रोही, अविश्वासू असा शिक्का मारला गेलेला असून, या समाजास गावकुसाच्या बाहेर काढून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असते.
इंडस हेलेनिकवरील तथाकथित खोट्या आरोपांच्या रहस्याचा शोध लागल्यास अनेक जणांच्या हितसंबंधास धक्का पोहोचला जाऊ शकतो, याच भीतीनं त्यांना डाएनिश गटाकडून विरोध होत असतो. जर हा इंडस हेलेनिक पंथ त्यांच्यावरील आरोपाचं खंडण करण्यात यशस्वी झाला, तर वर्तमानातील डाएनिश पंथाच्या सत्तेवर त्याचा परिणाम होऊन त्यांची सत्ता हातातून जाईल, या भीतीनं सत्तेवर असलेला हा पंथ त्याला विरोध करीत असतो.
ग्रीसच्या सत्तेसाठी शतकानुशतकं चाललेला हा संघर्ष, लढाया, रक्तपात, अशा वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या राजवटीत कार्यरत होत राहतो. आता मात्र हा संघर्ष अंतिम टप्प्यात आलेला असतो. इंडस हेलेनिकमधील अनेक जण या खोट्या आरोपांच्या मुळाशी जाऊन याचा सोक्षमोक्ष लावण्याच्या मागे लागलेले असतात. त्यातीलच एक वयोवृद्ध तपस्वी मार्कोस आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण याचा तपास करण्यात स्वतःचं आयुष्य खर्ची घालत असतानाच, एक भयंकर नाट्य सुरू होतं. त्यातून एक जीवघेणी स्पर्धा, पाठलाग सुरू होतो, एकमेकांवरील कुरघोड्या, सूडनाट्य, अनेक लोकांच्या निर्दयपणे हत्या, इतिहासातील राजवटी मधील पुराव्यांच्या साखळीचा शोध घेणं, असे प्रकार सुरू होतात.
यात सत्तेवर येऊ घातलेल्या, अन्याय झालेल्या इंडस हेलेनिक पक्षाबरोबर काही परदेशी कंपन्यांचा व्यापारी इंटरेस्ट निर्माण झालेला असतो. त्यामुळे त्या कंपन्या या पंथातील सदस्यांना आर्थिक पाठबळ देत असतात. पूर्वी इजिप्तच्या गल्फ ऑफ आकाबा समुद्रात बुडालेल्या जहाजाचा पुराव्यांसाठी पाणबुड्याच्या मदतीनं त्यांचा शोध घेणं, जुन्या वास्तूमधील काही शिलालेखातील संदर्भ शोधणं, देल्फीच्या ऑरकलच्या गूढ भविष्यवाणीचा अर्थ शोधणं, पुरातन ताम्रपटावरील संदेशाचा मागोवा घेणं, या सर्व घटना ग्रीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरून निवडणुकीत चुरस निर्माण होणे, असे अनेक नाट्यपूर्ण प्रसंग यांत गुंफले आहेत.
भूमध्य समुद्रातील ग्रीस बेटांच्या समूहातील नेक्सस बेटावरील सॅंगरी गावात सुरू झालेला हा जीवघेणा पाठलाग भारतात प्रवेश करतो. या पंथाच्या दोन सदस्यांची एक टीम भारतातील काही राज्यांतून फिरत, पुराव्यांची साखळी जोडत असते. दुसरी टीम तुर्कस्तानमधील इस्तंबूल, अंकारा, दियारबकीर, नेमरुत अशा शहरांतून शोध घेत फिरत असते. तर तिसरी टीम पूर्वी इजिप्तच्या गल्फ ऑफ आकाबा सामुद्रधुनीत बुडालेल्या जहाजाचा पाणबुड्याच्या मदतीनं शोध घेत असते.
या तिन्हीही टिम्सच्या मागे सत्तेवर असलेल्या पक्षाचे गुंड पाठलाग करीत असतात. त्यांना चुकवत इंडस हेलेनिकचे सदस्य आपले उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी होतील का? ग्रीसच्या राजधानीत अथेन्समध्ये, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत याच्या पुराव्यांसहीत शतकानुशतके चाललेल्या या संघर्षाचा शेवट करण्यात आणि इंडस हेलेनिक पंथाच्या समूहास न्याय मिळवून देण्यात यशस्वी होतील का? ग्रीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत निर्णायक विजय मिळवून देतील का? अशा अनेक गोष्टीची उत्तरं शोधण्याचा या कादंबरीत प्रयत्न केलेला आहे.
प्रकाशक : वनमाली प्रकाशन पुणे, पृष्ठ : 264 : मूल्य : 300 रुपये