Delhi car blast – भारतात दहशतवादी हल्ल्यांची कबुली देताना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला लक्ष्य केले असल्याचे धक्कादायक वक्तव्य पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी भर संसदेत केले. चौधरी अन्वरुल हक म्हणाले, मी आधीच सांगितले होते की जर भारताने बलुचिस्तानला रक्ताच्या थारोळ्यात बुडवत ठेवले तर आम्ही लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारतावर हल्ला करू. काही दिवसांनी, आमच्या शाहीननी घुसून हल्ला केला आणि त्यांनी इतक्या जोरदार प्रहार केला की मृतांचा आकडा अगणित आहे. त्यांनी संसदेत केलेल्या या भाषणाची एक क्लिप सध्या व्हायरल होत असून आता भारतातून याबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तानने आपल्या कारवाया चालूच ठेवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पाकिस्तानने हक यांच्या विधानाशी सहमती दर्शवलेली नाही. हक यांची ही राजकीय चूक आहे, म्हणून अविश्वास प्रस्तावाद्वारे त्यांना हटवण्यात आले आहे, असे ते म्हणाले. सोमवारी (17 नोव्हेंबर) पीओके विधानसभेत अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर चौधरी अन्वरुल हक यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रस्तावाला त्यांच्या विरोधात 36 मते पडली. गेल्या 4 वर्षांत पीओकेला चौथे पंतप्रधान मिळाले आहेत. पीपीपीचे राजा फैसल मुमताज राठोड हे नवे पंतप्रधान झाले आहेत. ठरावाविरुद्ध फक्त दोन मते पडली. पीपीपीच्या सर्व 28 आमदारांनी आणि उपस्थित असलेल्या पीएमएल-एनच्या 9 पैकी 8 आमदारांनी ठरावाला पाठिंबा दिला. पीटीआयच्या फक्त दोन आमदारांनी विरोधात मतदान केले.