Wayanad Tourism : वायनाड पर्यटनासाठी कर्नाटक सरकारकडून निधी; भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

बेंगळुरू : केरळमध्ये असलेल्या वायनाड येथील पर्यटनाचे जाहिरात कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाने (केएसटीडीसी) दिल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अशोक यांनी म्हटले आहे की, काॅंग्रेसने त्यांच्या हायकमांडला खूश करण्याची एकही संधी सोडलेली नाही. वायनाड हा काॅंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा यांचा मतदारसंघ असताना, त्याची जाहीरात कर्नाटक सरकार का करत आहे?
केएसटीडीसीने वायनाडचा प्रचार करणारी एक पोस्ट प्रसिद्ध केली असून त्यात म्हटले आहे की, तुम्हाला साहस हवे आहे की शांतता? तुम्हाला वायनाडमध्ये दोन्ही सापडतील! केएसटीडीसीसोबत तुमचा परिपूर्ण निसर्ग तुमचा बचाव करण्यास तयार आहे. आर. अशोक म्हणाले की, कर्नाटक सरकार वायनाडच्या जिल्हाधिकाऱ्यांसारखे वागत आहे. अशा मुख्यमंत्र्यांना तुम्ही किती काळ सहन करणार? तुम्ही कर्नाटकच्या करदात्यांच्या पैशांपैकी १० कोटी रुपये वायनाडला पाठवले. तेथील एका व्यक्तीच्या मृत्यूसाठी १५ लाख रुपये दिले आणि भूस्खलनग्रस्तांसाठी १०० घरे बांधण्याची घोषणा केली. आता, तुम्ही केएसटीडीसीच्या माध्यमातून वायनाड पर्यटनाला प्रोत्साहन देत आहात. हे पक्षश्रेष्टींना आनंद देणारे नाही का?
अशोक यांनी पुढे म्हटले की, उत्तर कर्नाटकातील कलबुर्गी, रायचूर, यादगीर, बिदर, विजयपुरा, बागलकोट आणि बेलागावी या जिल्ह्यात पुरामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. अशातच शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. तुम्ही तुमच्याच राज्यातील शेतकऱ्यांना मदत करत नाही आहात. परंतु इतर राज्यांना पैसे देण्यासाठी विजेच्या वेगाने निर्णय घेतले जात आहेत. त्यासाठी आम्हाला कर्नाटकातील नेत्याची गरज आहे, वायनाडचे ब्रँड अॅम्बेसेडर नको आहेत.
कन्नडनाडूची प्रतिष्ठा खराब – रवी
भाजप नेते आणि माजी मंत्री सीटी रवी म्हणाले की, केएसटीडीसीने कर्नाटकात पर्यटनाला चालना द्यावी, परंतु ते लोकांना वायनाडला भेट देण्यासाठी आमंत्रित करत आहे. वायनाड कर्नाटकात आहे का? केएसटीडीसी आता केरळचा भाग बनला आहे? मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी आणि राजकीय फायद्यासाठी इतर राज्यांमध्ये राज्य निधी खर्च करणे थांबवावे.





