MAH vs KER Ranji Trophy 2025 Match : दुसऱ्या दिवशी अडखळत सुरुवात केलेल्या केरळ संघाचा पहिला डाव 219 धावांमध्ये संपुष्टात आला. त्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्राच्या सलामीवीरांनी बिनबाद 51 अशी सुरुवात करताना 71 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या पृथ्वी शॉ आणि अर्शिन कुलकर्णी यांनी महाराष्ट्राला दुसऱ्या डावात भक्कम सुरुवात करुन दिली आहे. महाराष्ट्राने पहिल्या डावात ॠतुराज गायकवाडच्या 91 धावांच्या जोरावर 84.1 षटकांमध्ये 239 धावांपर्यंत मजल मारली होती. ऋतुराजला जलज सक्सेनाने 49 धावा करत सुरेख साथ दिली. केरळच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली होती. वेगवान गोलंदाज रजनीश गुरुबानी व जलज सक्सेना यांनी सुरुवातीलाच केरळ संघाला 3 धक्के दिल्याने, केरळची अवस्था 3 बाद 35 अशी दयणीय झाली होती. शुक्रवारी शुन्यावर नाबाद असलेल्या सचिन बेबी व संजू सॅमसन यांनी खेळायला सुरुवात केली. सचिन बेबी 7 धावांचे योगदान देवून परतल्यानंतर संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली. त्याला कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने 36, तर सलमान निझारने 49 धावा करताना सुरेख साथ दिली. संजू 54 धावांवर खेळत असताना त्याला विकी ओस्तवालने बाद केले. त्यानंतर तळाच्या फलंदाजांना महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी झटपट बाद करत केरळचा डाव 219 धावांमध्ये गुंडाळला. हेही वाचा – IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील सामने कधी आणि कुठे लाइव्ह पाहता येणार? जाणून घ्या महाराष्ट्राकडून जलज सक्सेनाने 3 तर मुकेश चौधरी, रजनीश गुरुबानी व विकी ओस्तवाल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. रामकृष्ण घोषने १ बळी टिपला. महाराष्ट्राने पहिल्या डावात महत्त्वपूर्ण अशी 20 धावांची आघाडी घेतली. महाराष्ट्राच्या सलामीवीर पृथ्वी शॉ व अर्शिन कुलकर्णी यांनी दुसऱ्या डावात आक्रमक सुरुवात करताना 9 षटकांत बिनबाद 51 अशी सुरुवात करुन दिली. त्यामुळे तिसरा दिवस अखेर महाराष्ट्राकडे 71 धावांची आघाडी झाली असून पृथ्वी शॉ 37 तर आर्शिन कुलकर्णी 14 धावांवर खेळत आहेत