Khed Police: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश; खेड पोलिसांकडून दोघांना अटक
Khed Police: खेड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाची मोठी कारवाई; दोन आरोपींना अटक करून १७ चोरीच्या मोटारसायकली जप्त.

Khed Police – मौजमजा करण्यासाठी विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी करणार्या सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात खेड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण (डीबी) पथकाला मोठे यश आले आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 17 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच 14 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण उपस्थित होते. निमगाव खंडोबा येथे 8 जून 2024 रोजी आयोजित बैलगाडा शर्यतीदरम्यान उभी असलेली स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच 12 टीई 9468) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना बारामती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार दत्तात्रय भोसले आणि आकाश कांबळे यांनी संशयित मोटारसायकलीची ई-चलन प्रणालीद्वारे पडताळणी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
त्यांनी तत्काळ ही माहिती खेड पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून रोहित आप्पासाहेब कानगुडे (वय 22) आणि चंद्रशेखर अनिल पवार (वय 22, दोघेही रा. नांदगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली. पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता आरोपींनी विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या 17 मोटारसायकलींच्या आधारे खेड, शिक्रापूर, पारगाव (का.), मंचर, महाळुंगे उत्तर आणि वडूज (सातारा) पोलीस ठाण्यांतील एकूण 14 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
“दुचाकी चोरट्यांकडून 17 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून अटक केलेल्या दोघांवर विविध ठिकाणी 14 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. ही टोळी पुणे व सातारा जिल्ह्यात सक्रिय होती. नागरिकांनी दुचाकी पार्क करताना तसेच वापरलेली वाहने खरेदी करताना आवश्यक कागदपत्रांची खातरजमा करूनच व्यवहार करावा.”
– अमोल मांडवे, उपविभागीय पोलीस अधिकारी





